कवडसा- आडवाटेवरील खजिना-२०
आडवाटेवरचा खजिना - २०
रंकाळा तलाव, कोल्हापूर
आहे कोल्हापूरकरांचा तो जिव्हाळा
होतो गोळा इथे पहाटे पक्षांचा गोतावळा
लय भारी याचा मान, आहे कोल्हापूरची शान
उन्हाळा, हिवाळा वा असो पावसाळा
लावी वेड सकळा
रंकाळा... रंकाळा...रंकाळा!
लहानपणी साधारण चौथी पाचवीत असताना, त्र्याअंशी साली बाबांना सुट्टी मिळत नसल्यामुळे काकांबरोबर उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईहून गावी जायचं नक्की झालं होतं. त्या काळात मे महिन्यात कोकणात जायचं म्हणजे अवघड काम. नेहमीप्रमाणे एस. टी. फुल्ल. मे महिन्याच्या सुट्टीत कोकणवासीयांना एस. टी. चं तिकीट मिळणं म्हणजे एखाद्या तिर्थयात्रेचं पुण्य पदरी पडल्यासारखं वाटायचं. एस.टी. स्टँडच्या तिकीट खिडकीपाशी रात्र रात्र जागून कोकणात जाणार्या एस टीचं तिकीट ज्यांनी ज्यांनी काढलं असेल ते त्या रात्री कधीच विसरू शकत नाहीत. मी तर अजिबात नाही. असो. त्यावर एक स्वतंत्र लेख लिहिता येईल.
पर्याय म्हणून काकांनी ट्रेनने कोल्हापूरमार्गे गावी जायचं ठरवलं. ट्रेनने हा एवढा मोठा प्रवास कोल्हापूर मार्गे गावी जाण्याचा आयुष्यातला पहिलाच. पुन्हा कोल्हापूर ते फोंडाघाट हा १०० किमी. प्रवास. अडीज ते तीन तासांचा, त्यातला ५० कि. मी. चा प्रवास राधानगरीच्या निसर्गरम्य जंगलातून, त्यामुळे आजही हवाहवासा वाटणारा.
सकाळी कोल्हापूर रेल्वे स्टेशनला उतरुन लगेच फोंड्याला जाणारी एस. टी. पकडली.
एस. टी. ने रंकाळा स्टँड सोडलं आणि थोड्याच वेळात राधानगरी रस्त्याला डावं वळण घेतलं. त्यावेळी एस. टी. च्या त्या खडखडणार्या, कधीही खाड्कन खाली पडू शकणार्या इवल्याश्या खिडकीतून उजवीकडे पहिल्यांदा ज्याचं दर्शन घडलं ते रंकाळा. ती माझी रंकाळ्याशी झालेली पहिली नजरभेट.
तेव्हा एस. टी. च्या त्या इवल्याश्या खिडकीतून मनसोक्त नाही बघता आलं, पण आवडलं ते ठिकाण. मनात ठाण मांडून बसलं.
अंबाबाई मंदिराच्या पश्चिमेला रंकभैरव उभा असून त्याच्या नावावरून या तळ्याचं नाव रंकाळा पडलय असं समजतं. ही एक दगडाची भलीमोठी खाण होती. इथला काळाकभिन्न दगड अंबाबाईच्या मंदिर उभारणीत वापरला गेला. तसंच आजूबाजूच्या जैन मंदिरांसाठी इथल्या दगडाचा, शीळांचा वापर झालेला आहे. भूकंपानंतर या दगडी खाणीत पाणी भरून त्याचं रुपांतर आताच्या रंकाळा तलावात झालं. छत्रपती शाहू महाराजांनी त्यावर साज चढवला. ईशान्येला सुंदर दगडी मनोरा आणि घाट बांधण्यात आला आहे. या तळ्याच्या दक्षिणेला कातळसदृश जमिन, पूर्वेला संध्यामठ आणि वायव्येला शालिनी पॅलेस, रंकाळ्याची शान वाढवतात.
गेल्या आठवड्यात कोल्हापूरला गेलो होतो. हॉटेल रंकाळ्याजवळच होते. रात्री सगळी कामं आटोपल्यावर कोल्हापूरच्या तांबडा पांढर्यावर ताव मारला खरा, पण जड जड वाटायला लागलं. म्हटलं चला मारु या फेरफटका रंकाळ्यावर... एखाद कि.मी. चाललो आणि निवांत बाकड्यावर जाऊन बसलो. रात्रीचे साडेदहा वाजायला आले होते त्यामुळे वर्दळ कमीच. पाच सहा मित्रांचा गृप मस्तीत दंग, कुणी शांतपणे बाकड्यावर बसलेलं, कुणी घाटाच्या पायर्यांवर पाण्यात पाय सोडून बसलेलं जोडपं, तर कुणी अजूनही शतपावली करतंय. पांढर्या प्रकाशझोतात न्हाऊन निघालेला दगडी मनोरा खूपच सुंदर दिसत होता. काठावरची रोषणाई रंकाळ्याच्या रात्रसौंदर्यात भर घालत होती. रंकाळ्याला कोल्हापूरचा ‘मरीन ड्राइव' असं संबोधलं जातं.
संध्याकाळी इथे चांगलीच वर्दळ असते; अगदी मुंबईच्या चौपाटीसारखीच. फरक इतकाच की मुंबईत समुद्र आणि इथे रंकाळा.
दुसर्या दिवशी सकाळी सहालाच जाग आली. ठरवलं! आजचा फेरफटका रंकाळ्यावर. सकाळचे साडेसहा वाजले होते; नभांनी आकाशात दाटी केली होती. तरीही रंकाळ्यावर प्रभातफेरी साठी येणार्यांची संख्या लक्षणीय होती. मनोर्याजवळ उभ्या असलेल्या गाडीवरच्या टोपातल्या चहाला अजून उकळी फुटायची बाकी होती, चहाची वाट न बघता मी मनोर्यापासून दक्षिणेकडे चालायला सुरवात केली. जूनचा दुसरा आठवडा होता; पावसाने नुकतीच दस्तक दिली होती. पाणी बरच खाली गेलं होतं; त्यामुळे संध्यामठ व्यवस्थित दिसत होता. हा पाण्यात उभा असलेला हेमाडपंथी सभामंडप. हेमाडपंथी दगडी वास्तू, आणि मी तिथे रेंगाळणार नाही असं होणारच नाही. बत्तीस नक्षीदार दगडी खांबांच्यावर कातळमंडप. देखणी वास्तू, थोडीशी पडझड झालेली. पावसाळ्यात रंकाळा पूर्ण भरल्यावर ही वास्तू पाण्याखाली असते. आता मात्र अगदी छान बघता येत होती. त्या काळ्याकभिन्न दगडी बांधकामात गणपतीची शेंदूर चढवलेली मूर्ती लक्ष वेधून घेत होती.
छपरावर वेगवेगळ्या जातीचे पक्षी आपली सुस्ती झाडत होते. काही पाण्यात विहरत होते. काहींची मासे पकडण्यासाठी जबरदस्त तंद्री लागलेली होती, तर काही आकाशात मस्त कळपाने विहार करत होते.
संध्यामठाचे दर्शन घेऊन मोर्चा पक्षांकडे वळवला. रंकाळा हे विविध जातीच्या पक्षांचे हक्काचे ठिकाण. भारताच्या उत्तरेकडून, अगदी युरोपातून येणारे पक्षी इथे स्थिरावलेले दिसतात. पण या परदेशी पाहुण्यांची संख्या आता रोडावली आहे. काही वर्षापूर्वी झालेले पाणीप्रदुषण हे मुख्य कारण. पाच सहा वर्षापूर्वी रंकाळ्याच्या पाण्यावर पाणफुटीचं जबरदस्त आक्रमण झालं होतं, तेव्हा आंदोलन वगैरे करून रंकाळा पुर्ववत करण्यात आलं. आजतरी पाणकावळे, पेंटेड स्टॉर्क, बदक श्रेणीतील इतर पक्षी, पाणकोंबडी रंकाळ्याच्या काठावर दर्शन देतात.
पाणकावळ्यांचा पाण्यातला विहार बघण्यासारखा असतो. वीस पंचवीस किंवा त्याहून अधिक संख्येने ते एकत्र गटाने विहार करत असतात. एखाद्याने शिटी मारावी तसे अचानक एकसाथ सगळे पाण्यात लुप्त होतात, पाच सहा सेकंदाने पुन्हा सगळे पाण्यावर येतात. वर येताना एखाद्याच्या तरी चोचीत मासा असतो. हे त्यांचं असं बराच वेळ चाललेलं असतं, खूप छान वाटतं बघायला.
रात्रभर उपाशी राहिलेले हे पक्षी पहाटे पहाटे जेव्हा रंकाळ्यावर येतात तेव्हा आपापली जागा पकडून बसतात. सगळ्यांचा एकच उद्योग सुरु असतो, मासे पकडणे..
रंकाळ्याच्या दक्षिण पूर्वेकडे कातळ, खडकाळ जमिन सुरु होते. इथे कोणी तरी आपली म्हैस धुवत असतं तर कोणाचीतरी चिलीपिली पाण्यात धमाल मस्ती करत असतात. मी गेलो तेव्हा चार देखण्या म्हशी त्यांची तीन चार फुटांची शिंग, लाल रंगाने रंगवलेली, पाण्यात मनसोक्त डुंबत होत्या, आणि ते समाधान त्यांच्या मुखावरुन ओसंडून वाहत होतं. एक छोटं रेडकू जणू काही गेल्या जन्माची ओळख आहे असं माझ्याकडे बघत होतं. लहान होतं, पाण्याला घाबरत असणार, काठावरच उभं होतं. त्याच्या मुखाभोवती बांधलेल्या लाल दोर्यात ते इतकं गोड दिसत होतं... फोटो काढायचा मोह नाही आवरता आला.
एक निर्मळ प्रेमी युगल सकाळी सकाळीच झाडाखाली पारावर बसलं होतं. एवढ्या सकाळी सकाळी कसल्या गप्पा चालल्या होत्या त्यांनाच ठाऊक. रम्य सकाळी तळ्याकाठी झाडाखाली पाठमोर्या बसलेल्या त्या युगुलाला फ्रेममध्ये कैद करावसं वाटत होतं, पण त्यांना पाठमोरं तरी का डिस्टर्ब करा असा विचार करून मी आपला मोर्चा इतर फ्रेम टिपण्याकडे वळवला.
रंकाळ्यावर रेंगाळून आता बराच वेळ झाला होता. मघाशी पाण्यात डुंबण्याचं अलौकिक समाधान ज्या म्हशींच्या मुखावर पाहिलं होतं त्या आता निमूटपणे पण डौलाने घरच्या वाटेला लागल्या होत्या. मीही घड्याळाकडे पाहिले, नऊ वाजत आले होते. आता ह्या रम्य विश्वातून कर्मविश्वात जाण्याची वेळ झाली होती.
स्वत:ची गाडी आहे, त्यामुळे कधी गावी जाताना तर कधी कोल्हापूरात कामानिमित्त आलेलो असताना, गाडी बाजूला उभी करून रंकाळा न्याहाळता येतं. आतापर्यत त्याच्या काठाने कधी राधानगरी रस्त्याने तर कधी गगनबावडा रस्त्याने कारने बर्याच वेळा गावी गेलो आहे. पण लहानपणी ओझरतं पाहिलेलं मनात ठाण मांडून बसलेलं रंकाळा त्या दिवशी मात्र मनसोक्त न्याहाळलं!
एवढंच म्हणेन...!
रम्य त्या पहाटे आले नभ उतरू उतरू
वाहे संगे वारा मंद हवा झुळझुळू
एकवटले काठावर पशु-पक्षी आबालवृद्ध श्रध्दाळू
विश्व अवघे तिथले झाले रंकाळू रंकाळू
_विजय सावंत
१३/०६/१९
पावसाळ्यात रंकाळा पूर्ण भरल्यानंतरची संध्यामठाची काही दृश्ये.
#rankala #kolhapur #sandhyamath #vijaysawant


Wow मस्त लिहिलयस
ReplyDeleteमी गेली आहे एकदा तिथे पण तुझ्या वर्णनासारखा काही दिसला नाही
😃शेवटी तुझ्या नजरेत आणि म्हया डोळ्यात फरक आहे हे खरं
फोटो नेहमीप्रमाणे खूपच सुंदर
मनःपूर्वक धन्यवाद! कधी पुन्हा गेलीस तर सकाळी लवकर रंकाळ्यावर फेरफटका मारायला जा, हे सगळं अनुभवायला मिळतं!
Deleteछानच
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!
Deleteरंकाळा तलाव हे माझेही आवडते ठिकाण आहे. परंतु संध्यामठ पाहाण्याच योग नव्हता तो तुमच्या नजरेतून पाहिला. शालिनी पॅलेसमुळे रंकाळ्याला शाही वैभव प्राप्त झाले आहे असे वाटत होतं. परंतु रंकाळ्याचे वैभव स्वतंत्र, अंगभूत आहे हे ह्या लेखामुळे प्रचीत झाले. रंकाळ्यावरची भेळ खाणे आणि मुंबईच्या चौपाटीवरील भेळ खाणे ह्याची तुलना होऊ शकत नाही. अगदी वातावरणसुद्धा स्वाद बदलु शकतो ह्याचा अनुभव येतो.
ReplyDeleteAnyway, सावंतसर रंकाळा आणि लेख लय भारी ! 👌🏻⚘🙏
मनःपूर्वक धन्यवाद, जय! रंकाळ्याचं वैभव हे खरंच स्वतंत्र आहे. हे त्याच्याकडे पाहिल्यावर आणि त्याच्या काठावर घडणाऱ्या घडामोडींचे बारकाईने निरीक्षण केल्यास दिसून येते. या सुंदर प्रतिक्रियेबद्दल आभार!🙏
Deleteखूपच सुंदर विजय मित्रा मलाही असे विश्व वेड करते तुझ्या या लेखानेही मला तिथे असल्याचा भास होत आहे आणि तो आनंद खरोकर मला घ्यायलाही आवडेल कारण मुळातच मीही निसर्गप्रेमी किंवा निसर्ग वेडाच आहे म्हण वाटल्यास .. खरंच छान लेख आहे... Gbu 🙌
Deleteमनःपूर्वक धन्यवाद मित्रा!🙏
Delete