आडवाटेवरील खजिना- १९

आडवाटेवरील खजिना-१९

श्रीक्षेत्र विमलेश्वर आणि किल्ले देवगड व्हाया बंदर

जिल्हा - सिंधुदुर्ग

       कोकणात देवगडला कामानिमित्त गेलो होतो. तीन वाजताच काम संपले. वेळ मिळाल्यास  देवगडला लागून असलेल्या वाडा येथील श्री विमलेश्वराचे  दर्शन घ्यावे असे मनात होतेच. १२ कि.मी. म्हणजे काहीच अंतर नव्हते, निघालो.

       श्री क्षेत्र विमलेश्वराकडे जाणारा सागरी महामार्ग कापत असताना एका उताराला समोर वाडेतर खाडीच्या पुलाचे सुंदर दृश्य नजरेस पडले. ते कॅमेरयात उतरवावे म्हणून सोबतचा DSLR काढला. बटण क्लिक केले... स्क्रीनवर काळे काळे... पुन्हा क्लिक केले... काळे काळे... असे का होतेय...? बटणही नीट दाबले जात नव्हते. बॅटरी तपासली...जाग्यावर नव्हती...  कदाचित रात्री चार्ज केलेली बॅटरी चार्जरमध्येच राहिलीय की काय...? घरी...फोंड्याला...? पण घेतल्यासारखी वाटत होती....बॅग तपासली...छे! विचार करण्यात वेळ न दवडता मारली एक टपली स्वत:लाच आणि निघालो... ठरवलं! आज cellphone photography!



         

         

     पावसाने आपली इनिंग पूर्ण केली होती. जिकडे पाहावे तिकडे भातकापणी चालली होती. नवीन भाताचा तो एक वेगळाच सुगंध मला खूप आवडतो. सगळीकडे पसरलेला तो गंध उरात भरून घेतला. भातकापणीच्या दृश्यांचा आस्वाद घेत घेत थोड्याच वेळात श्री क्षेत्र विमलेश्वराच्या प्रवेशद्वारापाशी पोचलो. गाडी पार्क केली आणि मंदिराकडे निघालो. सरळ मंदिरात न जाता आधी उजवीकडे असणार्या बारमाही कुंडाच्या पाण्याने हातपाय धुवून घेतले. तोंडावर पाणी मारले, मस्त ताजेतवाने वाटले. सुंदर परिसर! सगळीकडे जांभा दगड... माडापोफळीची जाळीदार हिरवळ... मंदिराच्या समोरच पूर्व पश्चिम वाहाणारा जांभ्या दगडात सौंदर्य अधिकच खुलून आलेला बारमाही ओहोळ... पलिकडच्या वाडीत जाण्यासाठी जांभ्या दगडात बांधलेला सुंदर सुबक पूल... नीरव शांतता...मंदिर पाहायच्या आधी हेच सगळे आवडून गेले.

       

 

        



         


         


           मी मंदिरात जायला आणि मंदिरातून तीन वयस्कर व्यक्ती बाहेर पडायला एकच गाठ. त्यातले एक काका पलिकडच्या वाडीतले होते. आणि इतर दोघे ओझरम गावाहून महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. माझा मंदिराला भेट देण्याचा हेतू सांगताच काकांनी मंदिराची माहिती देण्यास सुरवात केली.

          “हे पांडवकालीन मंदिर पाडवांनी एका रात्रीत बांधले... एका भल्यामोठ्या जांभ्या खडकात कोरून काढलेले आहे..  मंदिराच्या  प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला ब्रम्हा, विष्णु आणि महेश तर डावीकडे आहेत मारूतिराया, उजवीकडे गरूड.... या शिल्पांची काळानुरूप बरीच झीज झाली होती... ग्रामस्थांनी पुनर्लेपाने मुर्त्या पूर्ववत केलेल्या आहेत.... प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला मंदिराच्या उंचीचे अखंड कोरलेले हत्ती आहेत.... हे मंदिर एक जागृत देवस्थान आहे.... वाडा ग्रामस्थांकडून मंदिराची देखभाल आणि पूजा-अर्चना केली जाते... महाशिवरात्रीला मोठा उत्सव साजरा केला जातो." काकांनी चांगली माहिती पुरवली आणि आम्हा तिघांचा निरोप घेऊन त्या सुंदर सुबक पुलावरून आपल्या घराकडे निघाले.

         मंदिरात प्रवेश केला.  महादेवाचे दर्शन घेतले. आतील बाजूचे निरिक्षण करत करत बाहेर आलो. गुंफारूपी हे मंदिर सुंदर आहे. मुख्य गाभारा उंचीवर आहे, जांभ्या दगडातल्या खांबांवर आणि भिंतींवर जास्त नक्षीकाम करता येत नाही, पण बाहेरच्या छताचे आणि खांबांचे साधेसुधे सौंदर्य लक्ष वेधून घेते. अंधार असल्यामुळे वटवाघळांचा संचार आहे.

           मुख्य मंदिराच्या बाजूलाच गणपतीचे छोटे मंदिर आहे. आतली गणेशाची काळ्या पाषाणातील मूर्ती; सुंदर, सुबक आणि मनाला समाधान देणारी आहे. त्यालाच लागून काळभैरवाची गुंफा आहे. 


        


             



               



            


           


         


           



       माझे मंदिर परिसर पाहून कधी आटोपते याची वाट बघत ते दोन पाहुणे उभे होते. मघाशी ते जेव्हा प्रवेशद्वाराजवळ भेटले होते तेव्हा गप्पांच्या ओघात त्यांना देवगडला सोडायचे कबूल केले होते. ते लक्षात येताच मंदिर परिसरावर पुन्हा एक नजर टाकली आणि आम्ही देवगडकडे निघालो. गाडीत गप्पा मारताना कळाले की ते माझ्या ओझरमच्या भावोजींचे ( बहिणीचे मिस्टर) मित्र होते. गाडीतून उतरताना ‘सांगा प्रकाशला, भेटलो होतो म्हणून' असं बोलून त्यांनी निरोप घेतला.

          पाच वाजोक इले होते, आवशीक सांगून ठेवलं होतय, येताना देवगडचा म्हावरा घेवन येतलय. देवगड बंदरार रोज संध्याकाळी पाचाक माशांचो लिलाव सुरू होता. नुकत्याच किनारर्याक लागलेल्या बोटींतून ताज्या म्हावरर्याच्यो फाटयो उतरत होत्यो, लिलावाची बोली लावणारो आपल्या भाषेत समोरच्या म्हावर्याच्या ढीगाचो भाव पुटपुटत होतो. माझ्या डोक्यावरून गेली त्येंची ती भाषा. आठ हजार, सात सहा असा कायतरी कानार पडला. आवशीच्या घोवाक खावन म्हटला ह्या काय आपला काम नाय. एवढा म्हवरा घेवन काय फोंड्याक गावजेवान घालूचा हा...!   मी एका मावशीकडना पापलेटा आणि कोळंबी घेतलय. हयल्यो कोळणी मुंबयच्या कोळणीसारख्यो अपमान करणार्यो नाय. आपुलकीन याक पापलेट वर घालतील. बाजार चांगलोच फुललो होतो, नवीन  सीजनचो मासो हातोहात खपत होतो. फोंड्याक देवगड नायतर मिंठबांव ह्या दोन बंदराचो मासो येता. लय टेस्टी असता. माली सावतींनीच्या हातचा हळदीचा पान घालून केलेल्या मालवणी चटणीतला म्हावरा एकदा खाल्लास ना...! आयुष्यभर चव नाय विसरोचास!          

       मालवणी मुलखात पाय ठेवलय की ह्या असा होता बघा! आपल्या बोलीभाषेचो लळो लागता. व्हय! व्हय! कळता माका, सगळ्यांगा ती कळत नाय! पण वायच म्हावर्याच्या  निमित्तान चान्स मारून घेतलय.


         


          


             

          

           



           तिथून गाडी काढली आणि बंदराच्या दक्षिणेला गोलाकार वळसा घालून थेट देवगड किल्ल्याच्या बालेकिल्ला प्रवेशद्वरापाशी थांबवली.

             बालेकिल्ल्याच्या गोमुखी प्रवेशदारातून आत शिरताच डावीकडे हनुमान मंदिर नजरेस पडते, उजवीकडे नवीन मंदिराचे बांधकाम सुरू आहे. सुर्याला मावळतीचे वेध लागले होते, अश्यावेळी तो जास्तच घाई करतो असे वाटते. पण अंधार पडायच्या आधी किल्ला फिरुन झाला होता. किल्ल्याच्या आवारात १९६० साली उभारलेल्या दिपस्तंभाकडे वळलो. दिपस्तंभाचे तिकीट घेऊन वर आलो, ६० अंशाचे चार पॅनल असलेला हा प्रिझम/लॅटर्न मिनिटाला दोन फेर्या पूर्ण करतो. (मिनिटाला किती फेर्या पूर्ण करतो यावरून ते कोणते बंदर आहे हे आत खोल समुद्रात मार्गक्रमण करणार्या बोटींना कळते.) दोन मीटर व्यासाचा आणि सवामीटर उंचीचा हा लॅटर्न  समुद्रसपाटीपासून शंभर फूट उंचीवरून समुद्रात १५ मैल लांब प्रकाशझोत फेकतो. आपलं दीपस्तंभाचं काम चोख बजावतो. वरून किल्ल्याचा चारही बाजूंचा परिसर न्याहाळता येत होता. तीन बाजूंनी समुद्र आणि एका बाजूने जमीन असलेल्या या  किल्ल्यानेही इतिहासात आपली भूमिका चोख बजावलेली असणार, यात वादच नाही. किल्ल्याची रुंद आणि मजबूत तटबंदी आजही शाबूत आहे. बालेकिल्ल्याच्या तटबंदीलगत जमिनीकडचा भाग तीन मीटर रुंद आणि अडीज मीटर  खोल खंदकाने सुरक्षित केलेला आहे. एक पडका वाडा आजही गतकाळातल्या समृध्दीची साक्ष देत उभा आहे, धान्य किंवा दारूगोळा साठवण्याचे कोठार असावे. एक कुंपण घातलेली खोल बाव आहे. इतर बांधकामांची पडझड झालेली आहे. पूर्वेला बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वरासमोरून एक वाट खाली उतरते तिथून किल्ल्याचा उत्तरेकडचा भाग पाहाता येतो.  बालेकिल्ल्याच्या बाहेर किल्ला परिसरात वस्ती आहे.  त्यातूनच काही उंच बुरुज मान वर काढून आपले अस्तित्व दर्शवत उभे आहेत.

  


         


          


          


           


           

     


           

        

    

     

      

    

             श्रीक्षेत्र कुणकेश्वरला भाविकांचा ओघ कायम असतो. तिथून आठ कि.मी.वर असलेला हा आडवाटेवरील खजिना नक्कीच पाहाण्यासारखा आहे.

_विजय सावंत

स्थळभेट - १०/१०/१९


#vimleshwar #devgad #devgadfort #kathakavitakawadasa #vijaysawant





Comments

  1. सुंदर उतरलेय.👌🏻
    कोकण सौंदर्य वर्णन हा तुमचा हातखंडा आहे.
    श्री क्षेत्र विमलेश्वर, किल्ले देवगड आणि म्हावरा बाजार अशी त्रिस्थळी यात्रा एका लेखात झाली. त्याऐवजी तीन वेगवेगळे ब्लॉग असते तर आनंद त्रिगुणीत झाला असता.
    सूचनेबद्दल क्षमस्व.
    मी आपले लेखन आणि प्रकाशचित्रांचा चाहता असल्याने आपले साहित्य पुरवून-पुरवून चविचवीने आस्वादू इच्छितो. बस्स इतकेच. 🙏
    बाकी यू आर ऑल टाईम टॉप.

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद जय!
      तुमच्या कमेंट्स नेहमीच हुरूप वाढविणार्या असतात. हा लोभ सदा राहो!🙏

      Delete
  2. खुप छान माहिती आणि परिसर वर्णन.

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏

      Delete
  3. Viju tula manapasun dhanywad 🙏🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
  4. तुलाच हे इतके सुंदर फोटो फ्रेम कसे सापडतात रे
    दर्जेदार लिखाण
    नेहमीच हा आडवाटेवरचा खजिना वाचणे ही मेजवानी असते

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻

      Delete

Post a Comment