आणि बरंच काही- श्रीदत्त जयंती उत्सव, फोंडाघाट
श्रीदत्त जयंती उत्सव, फोंडाघाट
१९७८ साली मुंबईत आलो. मुंबईला येण्याआधी गावी बालपणात घालवलेली ती सहा सात वर्षे म्हणजे आयुष्यातील आठवणींचा अमूल्य ठेवा आहे. आठवणीही अशा की आठवणींचा धांडोळा घ्यायला जावं तर एकात एक गुरफटलेल्या कितीतरी आठवणी घरंगळत हजर होणार. त्यापैकी एक म्हणजे गावात होणारी जत्रा. कधी देवीच्या गोंधळाच्या निमित्ताने तर कधी दत्तजयंतीच्या निमित्ताने.... तो फक्त भक्तीभावाचा उत्सव न राहता आपसूकच त्याला जत्रेचे स्वरूप येते. आमच्या गावात गडगेसखल नावाची वाडी आहे. तेथील एका टेकडीवर तळेकर आणि देसाई या ग्रामस्थांनी शके १८३१ साली दत्ताची सुंदर मूर्ती स्थापन केली. पुढे वाडीतील ग्रामस्थांनी इथे मंदिर उभारले. तेव्हापासून आजतागायत मोठ्या थाटामाटात इथे दत्तजयंती उत्सव साजरा केला जातो. पंचक्रोशीतील ग्रामस्थ दत्तजयंतीला आवर्जून उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतात.
मंदिर एका निसर्गरम्य टेकडीवर आहे. साधंसुधं कौलारू आणि म्हणूनच मनाला समाधान देणारे आहे. गाभाऱ्यात दत्ताची सुंदर, प्रसन्न मूर्ती आहे. पारंपरिक पद्धतीने दत्तजयंती उत्सव साजरा केला जातो. दत्ताचा पाळणा बांधला जातो. दर्शन घेऊन बाहेर आल्यावर हातावर तीर्थ आणि सुंठवडा प्रसाद म्हणून दिला जातो.
मंदिराभोवती विद्युत रोषणाई केली जाते. उत्सवाला जत्रेचे रूप येते ते मंदिराभोवती लावण्यात येणाऱ्या दुकानांमुळे. मालवणी खाजा, खडके लाडू, कडक बूंदीचे लाडू तसेच खेळण्यांची दुकाने उत्सवात जान ओततात.
कोरोना नियम पाळूनच दर्शनासाठी पाठविले जात होते. कोरोनाचं सावट सर्वच उत्सवावर आहे, त्यामुळे यंदा काहीशी कमीच दुकाने लागली होती तरी उपस्थितांच्या उत्साहात मात्र कुठलीही कमी नव्हती. एका खेळण्याच्या दुकानाने माझे लक्ष वेधून घेतले. खूप सुंदर सजवले होते दुकान. लहान मुलांची जी काही खेळणी असतात ती सर्वच्या सर्व त्यांनी मांडली होती. बालपण आठवले. घरातून दर्शनासाठी निघताना त्यावेळी आमच्या हातात चाराने आठाने टेकवले जायचे. पिपाणी, शिटी, बेचकीसाठी ते पुरेसे असायचे. आमच्या वाडीपासून मंदिर अडीज किमी.वर. वाडीतील सर्व लहान मुले, त्यांच्या आया ताया, इतर लहानथोर तिन्हीसांजा उलटल्यावर दत्तमंदिराकडे निघत असू. नुकत्याच कापून झालेल्या भाताच्या वाफ्यातून वाट काढताना धमाल यायची. मध्येच कोणीतरी लहानगा मेरेला अडकून पडायचा. मग त्याची आई नाहीतर आजी चिमूटभर माती घेऊन त्याच्यावरून ओवाळून टाकायची. मंदिरात जाणे हा आनंद होताच, पण येताना तो द्विगुणित झालेला असायचा, कारण हातात आपले कुठलेतरी आवडते खेळणे असायचे आणि तोंडात पिपाणी.
काल दत्तजयंती निमित्ताने लावण्यात आलेल्या खेळण्याच्या दुकानात मन पुन्हा एकदा रमले. घेतली एक पिपाणी, वाजवली मनसोक्त.
_विजय सावंत
१९/०१२/२०२१
सेलफोन फोटो- विजय सावंत
#dattajayanti #dattajayantiphondaghat #vijaysawant


Sundar 👌👌👌🙏
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏
Deleteखूपच सुंदर
ReplyDeleteखूपच अतुलनीय
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏
Deleteखूपच अतुलनीय
ReplyDeleteसर,
ReplyDeleteवर्णन वाचून आम्हालाही हा आनंद घ्यावासा वाटला. आपला सहवास लाभला तर तो अधिक द्विगुणीत होईल. पुढच्या वेळी जमवल्यास आभारी राहीन. 🙏
नक्कीच!👍🏻
DeleteMast Vijay.
ReplyDeleteMazya hi kahi aathavani na Datt jyanti chya ujala milala. Aamchya vadyat vyayachi aani javalpas rahanari sarv mandali yayachi. Prasad pan same.
Thank you 😀😀
Shailesh
तुमच्या या अशा सुंदर कमेंट्स आल्या की माझ्याही लेखणीला हुरूप येतो. मनःपूर्वक आभार शैलैश!🙏☺️
Deleteमी बऱ्याच वेळा रंकाळा बघून आलो परंतु नजरेत तुमच्या मधील लेखकाची नजर नव्हती. आज लेख वाचला. खूप छान वाटले. पुन्हा एकदा आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद.
ReplyDelete