कवडसा- आडवाटेवरील खजिना- १८ सोनगीर किल्ला

 आडवाटेवरचा खजिना - १८

किल्ले सुवर्णगिरी, सोनगीर, धुळे

             उत्तरेला सोनगीर  आणि दक्षिणेला लळिंग,  धुळ्यावर नजर ठेऊन असलेले सोप्या श्रेणीत मोडणारे हे दोन गिरीदुर्ग.

               धुळेकर आणि आजूबाजूचे जिल्हे सोडले तर सहसा कुणाच्या परिचयाचे नसलेले हे कमी उंचीचे पण महाराष्ट्र- आग्रा जोडणार्या ऐतिहासिक रस्त्यावरचे भौगोलिकदृष्ट्या महत्वाचे किल्ले.

             धुळे इंदौर महामार्गावर धुळ्यापासून वीस कि.मी.अंतरावर सोनगीर गाव लागते. धुळ्याहून अर्ध्या तासात सोनगीरला पोहचता येते. आज सोनगीर किल्ल्याला भेट द्यायचा योग आला होता. बर्यापैकी सुस्थितीत असलेला उत्तरेकडील एकमेव बुरूज आणि त्यावर फडफडणारा भगवा पायथ्याला लागून असलेल्या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधून घेतो. सर्विस रोडला लागल्यावर एकाला विचारले किल्ल्यावर कसे जायचे. त्याने छान समजावून सांगितले. गाडी किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाते. गावातल्या रस्त्यावरून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जात असताना सोनगीरच्या एका वैशिष्ट्याने माझे लक्ष वेधून घेतले. किल्ल्याच्या पायथ्याशी किल्ल्याला समांतर दक्षिणोत्तर असा गावातील रस्ता आहे. त्याच्या दोन्ही बाजूची घरे सकाळच्या घरातल्या कामांमध्ये व्यस्त होतीच पण अजूनही काही सामानाची जुळवाजुळव मुख्य दरवाजाच्या बाहेर चालू होती. रस्त्याच्या कडेला गाडी उभी केली. याच रस्त्यावरून एक नव्यानेच बांधण्यात आलेली प्रशस्त पायर्यांची वाट गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत जाते. कमी उंचीचा गड असल्याने थोड्याच वेळात मी गडाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहचलो. प्रवेशद्वार म्हणजे झुलत्या मनोर्यासारखी कललेली प्रवेशद्वाराची चौकट, हो चौकट! प्रायोगिक रंगभूमीवर घर दर्शवण्यासाठी जशी चौकट उभी करतात तशी. जिचे बाकीचे आधार जमीनदोस्त झालेले आहेत, अडगळीत पडलेले आहेत, किल्ल्याच्या गतकाळातील वैभवाची साक्ष देत प्रवेशद्वाराची चौकट आजही उभी आहे. इथून पुढे गडमाथ्यावर जाण्यासाठी त्याकाळी दगडात खोदलेल्या मजबूत पायर्यांची वाट आहे. मुख्य म्हणजे ती शाबूत आहे. त्या दगडी वाटेच्या सौंदर्याचा आनंद घेत माथ्यावर पोहोचलो. गडावर पोहचताच चारही बाजूला नजर फिरवली.  एखाद्या किल्ल्यावर दिसणार्या कुठल्याच वास्तू किंवा बांधकाम शिल्लक नसले तरी चहूबाजूंनी दूरदूरपर्यंत दिसणारा तो मैदानी मुलूख त्या गडाचे तिथले महत्त्व मात्र अधोरेखित करतो.

           धुळे इंदौर महामार्गावरून दिसणारा सोनगीर किल्ला.



             उत्तरेकडील बुरुज.
      
            किल्ल्याची तटबंदी.



               केवळ चौकटीच्या रूपात उरलेले किल्ल्याचे प्रवेशद्वार.


               इतस्ततः विखुरलेले प्रवेशद्वाराचे अवशेष.
   
            किल्ल्यावर जाणारी शेवटच्या टप्प्यातील दगडी वाट.

           किल्ल्यावरून दिसणारा महामार्ग.


               किल्ल्यावरून दिसणारे सभोवतालच्या परिसराचे विहंगम दृश्य.





               किल्ल्यावरील बांधकामांचे अवशेष.

                तेल तूप साठविण्यासाठी जमिनीत बांधण्यात आलेले रांजण.

                   गर्द झाडी वाढलेली आयताकृती विहीर.

            सुरत - बुरहानपुर या व्यापारी मार्गाला  तत्कालीन सम्राटांच्या साम्राज्यवाढीची उत्तर - दक्षिण वाट सोनगीर येथे छेदते. या मोक्याच्या जागेवर लक्ष ठेवण्यासाठी दक्षिणोत्तर ३०० मीटर लांब व पूर्वपश्चिम ५० मीटर रुंद आणि समुद्रसपाटीपासून १००० फूट उंच असलेल्या या डोंगरावर किल्ल्याची निर्मिती झाली असावी.  १३४०- ४२ ला आफ्रिकन प्रवाशी इब्ज बटुताने सोनगीरचे वर्णन आपल्या प्रवासवर्णनात केले आहे. १२ व्या शतकात इथे यादवांचे राज्य होते. इ. स. १३७० मध्ये खानदेशचा फारुकी घराण्याचा संस्थापक राजा मलिक याने हल्ला चढवून हा किल्ला ताब्यात घेतला. इ. स. १६०० ला फारूखी सत्ता संपुष्टात यायच्या आधी इ. स. १५७५ ला झालेल्या युध्दात राजा उग्रसेनचा पुत्र मानसिंग येथे मृत्युमुखी पडला, त्यासंबंधीत एक शिलालेख प्रवेशद्वारावर होता जो निखळल्यानंतर धुळ्याच्या राजवाडे इतिहास संशोधन केंद्रात जतन करून ठेवण्यात आला आहे. सोनगीरवर सत्ता असणारा औरंगजेब हा शेवटचा मोघल बादशहा. १७५२ मध्ये मराठ्यांनी निजामाचा पराभव केल्यावर भालकीच्या तहानुसार हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. बाळाजी बाजीराव पेशव्यांनी याचा ताबा नारोशंकरांकडे सोपवला होता. शेवटी १८१८ साली तो इंग्रजांकडे गेला. किल्ल्यावर त्यावेळी काही वास्तू असल्याचा उल्लेख आपल्या नोंदीत इंग्रजांनी  करून ठेवला होता. (माहितीस्रोत-गुगल आणि स्थळाच्या जागी उभारण्यात आलेला अधिकृत माहिती देणारा फलक.)

           असा हा अनेक राजवटींचा साक्षीदार असलेला किल्ला आज ढासळलेल्या अवस्थेत आपलं अस्तित्व टिकवून आहे. किल्ल्याच्या उत्तर बुरुजावरची तोफही धुळ्याला  राजवाडे मंडळात नेण्यात आली आहे. जमिनीत खोदलेले तेलातुपाचे दगडी रांजण तेवढे शिल्लक आहेत.  गडावर आयताकृती भलीमोठी विहीर आहे, पाणी किती खोल आहे याचा अंदाज येत नाही. त्याकाळी हेच पाणी खापराच्या नळ्यातून खाली पुरविण्यात येत होते. विहीर खोदलेली आहे. निघालेला दगड तटबंदी, बुरूज आणि वाड्यासाठी वापरला गेला असावा. विहीरीच्या बाजूलाच वाड्याचे आणि पुष्करणीचे जमीनदोस्त झालेले अवशेष पाहायला मिळतात. 

         गड फिरून झाला होता.  पूर्वेला खाली सोनगीर गाव दिसत होते.

ठण्... ठण्... ठण् ....

कधी डावीकडून तर कधी उजवीकडून हा स्टिरीओफोनिक ठणठणाट कानावर येत होता, मध्येच टण्..., टण्..., टण्....

          किल्ल्यावरचा फेरफटका आटोपून खाली उतरत असताना एक मेंढपाळ आपल्या शेळ्या मेंढ्या चरायला वर घेऊन येताना दिसला. ती दगडी वाट मोकळी झाल्यावर मी खाली उतरायला घेतले. गाडी पार्क केली होती त्या रस्त्यावर आलो. रस्त्याच्या उजवीकडे चार घरं सोडून एक  ठणठणाट चालू होता, तिथे गेलो. अंदाज आला होता तरी कुतुहलाने ते काय चाललय पाहू लागलो.

           सोनगीर. एकोणीसाव्या शतकापर्यंत परगण्याचे ठिकाण. येथील बाजारपेठ व तांब्याची भांडी प्रसिद्ध होती. आजही नव्या पिढीकडून ही परंपरा जपली जात आहे. सोनगीर तांब्यापितळेच्या भांड्यांसाठी, मंदिराच्या कळसाच्या पत्र्यासाठी,  नक्षीकाम केलेल्या देवदेविकांच्या तांब्यापितळेच्या मुखवट्यासाठी आजही प्रसिद्ध आहे, हे आज मला कळाले. 

         कोल्हापूरजवळील हुपरीत जसे घराघरात चांदीचे काम चालू असते तसे इथे घराघरात तांब्यापितळेचे पत्रे बडवण्याचे, त्यांना आकार देण्याचे, घडे तयार करण्याचे, आणि तयार घड्यांना टाके घालण्याचे काम सतत चालू असते. सोनगीरच्या बाजारपेठेत, तसेच बाहेरगावी, आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये सोनगीरच्या घड्यांना विशेष मागणी आहे. 

            “तुम्ही पत्रकार आहात का?"  हातात कॅमेरा बघून घड्याच्या पत्र्यांना जुळवण्याचे काम करत असलेल्या काकांनी त्यांचे काय चाललेय हे पाहत उभ्या असलेल्या मला विचारले. “नाही हो! मला आवड आहे वेगवेगळी ठिकाणं पाहायची, एखाद्या गावात काही खास असेल तर माहिती गोळा करायची, आज हा किल्ला पाहायला आलो होतो. तुमचा फोटो घेऊ शकतो का मी?"

 “घ्या! घ्या!"काका म्हणाले आणि आत गेले. येताना हातात घड्याचे वेगवेगळे भाग म्हणजे तळाचा, त्याच्या वरचा, त्याच्या वरचा निमुळता होत जाणारा आणि  तोंड असे चार भाग घेऊन आले आणि मला जुळवून दाखवू लागले. ” हे असे चार भाग असतात, त्यांना ठोकून ठोकून आकार दिला जातो, सगळे जुळवून घडा तयार होतो, मग पॉलिश आणि टाके." काका अगदी मनापासून सांगत होते. बाजूच्या घराच्या पायरीवर तीन तयार झालेले घडे रांगेत लावून ठेवले होते. विशेष म्हणजे आजही पारंपरिक पद्धतीने हे काम चालू आहे. तांब्याचे घडे बनविण्याची ती सगळी प्रक्रिया बघून आणि काकांचा निरोप घेऊन मी तिथून निघालो. गाडी एका देवळापाशी थांबवली. एक इसम देवळासमोरच्या मोकळ्या जागेत जमिनीवर चारपाच घडे  घेऊन बसला होता, अगदी  तल्लीन होऊन त्या तयार घड्यांवर टाके मारण्यात मग्न होता. खूपच सुंदर घडे होते ते. ते पाहिल्यावर वाटले आजूबाजूच्या गावात लग्नात माहेरहून जी भांडी देतात त्यात सोनगीरचा घडा नक्कीच भाव खाऊन जात असणार. चार दिवसासाठी माहेरी आलेली इथली माहेरवाशीण जेव्हा सासरी जात असेल आणि सासू विचारत असेल 'माहेरहून काय आणलेस?' तर ती अभिमानाने सांगत असणार “सोनगीरचा घडा आणलाय जी!"








          दहा बारा घरे सोडली की पुन्हा तेच. ठण् ठण् ठण्.  

           किल्ल्यावरून दिसणारे ते विस्तृत मुलुखमैदान डोळ्यात आणि सोनगीरचा तो ठणठणाट, टणटणाट कानात साठवून मी परतीची वाट धरली.

_विजय सावंत

फोटो- विजय सावंत

स्थळभेट- २०/०९/१९


#songir  #songirfort  #suvarngirifortdhule  #vijaysawant


Comments

  1. खुप सुंदर वर्णन आणि माहिती.

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏

      Delete
  2. नेहमी प्रमाणेच वाचताना त्या परीसरात घेऊनच जातोस हाताला धरून.......

    ReplyDelete
  3. Va va, khup chan Vijay.
    Tambyachi mahiti mast!

    Kept it up and stay safe!

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏

      Delete

Post a Comment