कवडसा- आडवाटेवरचा खजिना १७- आगाशिव लेणी, कराड
आडवाटेवरचा खजिना - १७
आगाशिव लेणी, जखिणवाडी, कराड
जिल्हा - सातारा
पुणे बँगलोर महामार्गावरील काही स्थळदर्शक पाट्या मला प्रत्येक प्रवासात खुणावत असतात, पण वेळेअभावी भावीच राहतात. कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने निघालो होतो. दुसर्या दिवशी कराडला काम होते, रात्री कराडला मुक्काम केल्यास सकाळी सहा ते दहा वेळेत इथल्या एका पाटीवर फुली मारता येईल असा विचार करून मी कराडला मुक्काम केला. यावेळी सोबत वाडीतला मंगेश होता.
कराड. ऐतिहासिक, राजकीय महत्व असलेले, प्राचीन काळाचा संदर्भ असलेले, सातारा कोल्हापूरच्या मध्ये, कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमावर वसलेले प्रसिद्ध शहर. इथून जवळच आठ किलोमीटर आडवाटेवर नैऋत्येला असलेला एक खजिना खूप दिवसांपासून साद घालत होता.
आगाशिव लेणी. बौध्दकालीन, कार्ला आणि भाजे लेण्यांच्या समकालीन १०८ लेण्यांचा आगाशिवच्या डोंगररांगेतील हा समूह. सध्या ६४ लेणी सुस्थितीत आहेत. आगाशिव, भैरव आणि डोंगराई अश्या तीन वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली... पैकी लेणी क्रमांक १ ते २६ आगाशिव डोंगराच्या दक्षिण पूर्वेला जखिणवाडीजवळ आहेत. कोल्हापूरहून कराडला जाताना कराडच्या जरा अलिकडे मलकापूरच्या आधी एक रस्ता डावीकडे वळतो, पुढे जखिणवाडीतून आगाशिव लेण्यांच्या पायथ्याशी जातो.
सकाळी लवकरच निघालो. सूर्याने अजून दर्शन दिले नव्हते पण शेतातले पोश्यापेक्षा मोठे सूर्यफूल पाहून मन प्रसन्न झाले.
पायथ्याजवळ पोहचायच्या जरा आधी डावीकडून मोरांची केकारव कानावर पडताच आणि उजवीकडे एक मोर मातीत आपली चोच खुपसत असताना लक्षात आले इथेही मोरांची एक कॉलनी आहे. मोर कुठेही कॉलनी उभारत नाहीत. त्यांचा चॉईस लय भारी असतो. डोंगरउतार... खाली गर्द उंच झाडी... त्याच्यापुढे सुरु होणारं निर्जन शेत... असाच मोक्याचा प्लॉट लागतो त्यांना. त्यांच्या नादाला न लागता तसाच पुढे गेलो, गाडी पार्क केली. लेण्यांच्या पायथ्याशी वनीकरण केलेली गर्द झाडी आहे, सुखावह आहे. तिथे तासभर बसून राहिल्यास शरीरातील ऑक्सिजन लेवल १००% होईल अशी. हल्लीच्या काळात बांधलेली दगडी पायर्यांची उभ्या चढणीची प्रशस्त वाट लेण्यांपर्यंत जाते.
नुकताच पावसाने निरोप घेतलेला... जाताना त्या डोंगरावर सुंदर सुंदर मनमोहक रानफुले सोडून गेला होता. दोन्ही बाजूला कितीतरी निरनिराळ्या जातीची इवली इवली वेगवेगळ्या रंगाची आणि ढंगाची फुले त्या दगडी वाटेचे सौंदर्य खुलवत होती. ते लुटतच एका दमात आम्ही एक नंबरच्या लेण्यापर्यंत पोहोचलो. थोडा दम खाल्ला. समोर नजर फिरवली... घोड्याच्या नालेसारखी ती डोंगररांग... खाली गर्द झाडी...त्यात चाललेलं मोरांचं केकारव... त्यावर सुंदर रानफुलांचा साज...सकाळचं सुखद वातावरण...मस्त! खालचा परिसर खूपच सुंदर दिसत होता. सकाळचे साडेआठ वाजले होते. ही लेणी भारतीय पुरातत्व विभागच्या अखत्यारीत आहेत. काही कामगार इतक्या सकाळीच डागडुजीच्या कामात व्यस्त होते. अन्यथा हा परिसर निर्जन, एका बाजूला, शांत निवांत आहे.
आम्ही एक नंबरच्या लेण्यापासून सुरवात केली. मुंबईतल्या बोरीवलीजवळच्या कान्हेरी लेण्यांसारखी ही लेणी आहेत. बर्यापैकी सुस्थितीत आहेत. वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक लेण्यासमोर एक पाण्याचं टाकं आहे. आगाशिवच्या डोंगरात असलेल्या तीन समूहापैकी हा २६ लेण्यांचा नंबर एकचा समूह. सगळ्या लेण्यांना नंबर दिले आहेत. लेणी क्रमांक ६,७,१२,१७ यामध्ये स्तूप आहेत. विसाव्यासाठी आणि वर्षावासासाठी ही लेणी खोदललेली आहेत. २२ नंबरचे लेणे मोठा मंडप आहे, त्यात आठ शयनगृह आहेत, प्रत्येक शयनगृहात झोपण्यासाठी दगडातच कोरलेले ओटे आहेत. प्रत्येक शयनकक्षाला दरवाजासाठी खाच आहे. वीसाव्या लेण्यापर्यंत पक्की दुतर्फा फुलांनी सजलेली दगडी रुंद वाट आहे. पुढे साधारण इंग्रजी A आकाराचा या डोंगराचा आकार आहे, A च्या मध्यावर दगडी बांधीव वाट संपते, वरून एक पाण्याचा प्रवाह वाहतो, तिथे आम्ही तहान भागवली. पुढे सव्वीसाव्या लेण्यापर्यंतची वाट कच्ची आहे, मी पंचवीसाव्या लेण्यापर्यंत गेलो. सव्वीसावे लेणे खूपच अडचणीत होते. खूप साधी पण सुंदर लेणी आहेत एकदा आडवाट करून बघण्यासारखी.
पुन्हा एकदा तो सुंदर परिसर नजरेत भरून आम्ही एक नंबरच्या लेण्याकडे माघारी फिरलो. परतत असताना एक काका दिसले. मी नेहमीप्रमाणे त्यांच्याकडून काही माहिती मिळेल म्हणून चौकशी केली, तेव्हा त्यांनी सांगितले “ मी खूप आजारी होतो... डॉक्टरने हात वर केले होते... माझे थोडेच दिवस शिल्लक आहेत असे सांगितले... आजाराला कंटाळून मी घरदार सोडलं आणि ह्या आगाशिवच्या डोंगरात कायमचा मुक्कामाला आलो... इथेच राहून चिंतन मनन, ध्यानधारणा करतो!"
मी विचारले “जेवण तुम्हीच करता का?"
“नाही, इथे चूल पेटवायला मनाई आहे, इथे लेण्यांपासून १०० मीटरच्या परिसरात कुठलंही अतिक्रमण, बांधकाम करायला, विस्तव पेटवायला मनाई आहे." काकांनी माहिती पुरवली.
“मग जेवणाचं काय करता?" मी उत्सुकतेने विचारले.
“खालच्या वाडीतून देतात आणून!" काका म्हणाले.
काकांनी दिलेली माहितीने मी अचंबित झालो, काका गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ इथे या निर्जन स्थळी एकटेच राहत आहेत. डॉक्टरने ज्या माणसाची जगायची आशा सोडली होती तो माणुस आज निसर्गाच्या कुशीत ठणठणीत तब्बेतीत आयुष्य जगत आहे, वयाच्या पासष्टाव्या वर्षी. मी एवढेच म्हणेन की काकांच्यापुढे आजचे विज्ञान हरले निसर्ग जिंकला. विज्ञान वाईट नाही पण विज्ञानातल्या चुकीच्या गोष्टी अंगवळणी पाडून घेऊन आपणच डॉक्टरी पेशाला उभारी आणली. या वसुंधरेवर वास करणार्या हजारो जातीच्या जीवांपैकी मनुष्यप्राण्याव्यतिरिक्त कुठलाही प्राणी डॉक्टरकडे जात नाही. असो. आणि सामाजिक बांधिलकी... सामाजिक बांधिलकी काय असते हो! ही घ्या जितीजागती सामाजिक बांधिलकी! गेली तीस वर्षे काकांना खालच्या वाडीतून इतक्या उंचावर जेवण पुरवलं जातंय.
काकांसोबत गप्पा चालल्या असताना माझे लक्ष या डोंगररांगेतील एका उंच शिखरावर गेले. डोंगराच्या टोकावर एक देऊळ लक्ष वेधून घेत होते. “काका ते वर मंदिर दिसतय ते कुठलं आहे?" मी विचारले.
“ते महादेवाचे मंदिर आहे, तिथे जायचे आणि हात जमिनीला समांतर ठेऊन असे बोट फिरवायचे, तुम्हाला डोंगराचा नैसर्गिक ॐ बघायला मिळेल."काकांनी अगदी बोटांची अॅक्शन करून दाखवली. पुढे पुस्तीही जोडली “बर्याच लोकांनी ड्रोनने शुटिंग केलं आहे!"
झालं...! काकांनी ही अधिकची माहिती पुरवली आणि माझ्या पुढच्या नियोजनातली वेळ उणे करून टाकली.
काकांचा निरोप घेऊन मी निघालो. ( जर कोणी आगाशिव लेणी बघायला जाणार असेल तर थोडी फळं काकांसाठी घेऊन जा.)
तिथून पुन्हा पहिल्या लेण्यापर्यंत आलो, इथूनच एक वाट आल्या मार्गावर खाली उतरत होती आणि डावीकडून एक वाट वर उंचावर त्या डोंगराच्या टोकावर जात होती, चांगलाच उभा चढ दिसत होता. मंगेशला विचारलं “काय मंग्या! जावया काय? झेपात तुका?"
“माका काय नाय, तुम्ही म्हणत असशाल तर जावया!" मंगेश.
आधीच डोंगराच्या अर्ध्यावर तर आलो होतो, पुन्हा या आडवाटेचा योग कधी जुळून येईल काय माहिती. नाही गेलो तरी ॐ काय पिच्छा सोडणार नाही.
निघालो आडवाटेवरल्या आडवाटेवर. अर्धा तास तो उभा चढ चढल्यावर जरा दम लागला. बसलो थोडावेळ. पुन्हा चढायला सुरवात केली, आता आम्ही काहीशा सपाट भागावर आलो, हा दुसरा टप्पा. उजवीकडे एक विहीर आणि वास्तू दिसली. तो आगाशिव भक्त मंडळाचा योगी सद्गुरु बाबामहाराजांचा मठ होता, थोडा वेळ तिथे बसलो. एक साठ पासष्टीतल्या बाबांनी आम्हाला मघाशी वाटेत दिसलेल्या उघड्या विहीरीतले तांब्याभर पाणी दिले, चवदार होते, तृप्त झालो. त्यांची विचारपूस करून पुढे निघालो. शेवटच्या टप्प्यात म्हणजे तो डोंगराच्या धारेवरून उभा चढ चढून आम्ही महादेवाच्या मंदिरात पोहचलो.
चांगलीच दमछाक झाली होती. पण तिथून दिसणार्या निसर्गाच्या अद्भूत रूपाने थकवा कुठल्या कुठे पळवून लावला होता. आता आम्ही आगाशिव डोंगराच्या सर्वोच्च शिखरावर होतो. पूर्वेला कृष्णेचे पात्र पार्यासारखे चमकत होते... कराड, मलकापूरचे दर्शन होत होते... डोंगरउतारावर वाढलेल्या गवतात वार्याचा लडिवाळपणा चालला होता... गवतात निर्माण होणार्या लाटा समुद्राच्या लाटांपेक्षाही भाव खाऊन जात होत्या. बघण्यासारखे होते ते दृश्य. वरून चारही बाजूचा विस्तृत प्रदेश नजरेत भरून घेतला. खूपच सुंदर अनुभव होता तो. खरं तर तिथून निघूच नये असे वाटत होते.
पलिकडच्या(पश्चिम) विंग गावातून दोघे महादेवाच्या दर्शनाला आले होते, त्यांच्यापैकी एकाने पाणी दिले. थोडा वेळ शांत बसलो. छातीतली धडधडही एव्हाना शांत झाली होती. महादेवाचे दर्शन घेतले.
उत्सुकता होती ती ॐची. काकांनी सांगितल्याप्रमाणे पोझिशन घेतली. नजर फिरवली... त्या नैसर्गिक सलग डोंगररांगांनी बनलेला ॐ दिसला. पाठीमागच्या रफारासहित. जगातला हा एकमेव नैसर्गिक ॐ कॅमेर्रात उतरवणं शक्य नव्हतं पण डोळ्यांच्या लेन्समधून उतरवला कायमचा स्मृतीपटलावर.
_विजय सावंत
स्थळभेट- १४/१०/१९
फोटो- विजय सावंत
#agashivcaves #agashivkarad #naturalom #buddhacavesindia #vijaysawant


सुरेख ! 👌🏻
ReplyDeleteशब्दांच्या पलिकडलं अक्षरात उतरवण्याची आपली हातोटी विलक्षण !!
निवेदन आणि समर्पक प्रकाशचित्रांची पखरण तर अप्रतिमच !!!
कुठेही ना रटाळ ना पाल्हाळ.
बांधेसूद बांधणी !!!!!⚘
विजय सावंत सर, धन्यवाद, एक अविस्मरणीय अनुभव दिल्याबद्दल !!!!🙏
या सुंदर कमेंटबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !🙏
Deleteतुझी फोटोग्राफी भारी
ReplyDeleteआणि लिखाण तर लंय भारी
मनःपूर्वक धन्यवाद!
DeleteChaan lihile ahe ani photos mule te anubhavayla pan milale
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏
Delete