आणि बरंच काही- विजयादशमी
विजयादशमी
आज विजयादशमी. रामाने रावणावर विजय मिळवला तो दिवस. केवळ रामाने रावणावर विजय मिळवला इतपतच या दिवसाचे महत्त्व नाही. आयुष्य कसं जगावं हे रामायण आणि महाभारत आपल्याला शिकवतात. रामरावण युध्दाच्या आधीचा त्यांच्या आयुष्यातील घटनाक्रम आपल्याला माहीत आहे. एक वडिलांच्या वचनपूर्तीसाठी वनवासाला निघालेला सर्वगुणसंपन्न राम, दुसरा अहंकाराने पछाडलेला रावण. सर्व सुखं पायाशी लोळण घेत असतानाही रावणाला सीताहरणाची बुध्दी सुचावी. त्याचे पर्यवसान रामरावण युध्दात व्हावे, आणि शेवटी तेच. सत्याचा असत्यावर विजय. रामायण आणि महाभारत हे दोन्ही हिंदू धर्मग्रंथ समाजासाठी मार्गदर्शनाचे काम करतात. तुम्ही आयुष्यात रावणासारखे काम करा, तुमचा पराजय ठरलेला आहे. तुम्ही रामासारखे काम करा, तुमचा विजय अटळ आहे.
नुकतेच आपण सारे कोरोना महामारीतून बाहेर आलो आहोत. त्यात कितीतरी कुटुंबांचे नुकसान झाले आहे, कुणाचे घरातील सदस्य गेले असतील, कुणाची नोकरी गेली असेल, कुणाचे याहूनही अधिक वाईट अनुभव असतील. गेली दीड-दोन वर्षे आपण या साथीच्या सावटाखाली काढली. त्यातून बाहेर येणं गरजेचं आहे. अशावेळी आपल्या संस्कृतीत साजरे केले जाणारे सण मोलाची भूमिका बजावतात. हर रंग कुछ कहता है, तसंच प्रत्येक सण आपल्याला काहीतरी सांगू पाहातो. पुढे गाफिल राहून चालणार नाही पण गलितगात्र होऊनही चालणार नाही. उत्सवांचे रंग उत्साहात उधळलेच पाहिजेत.
सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏
_विजय सावंत
१५/१०/२०२१


खूप छान
ReplyDeleteधन्यवाद!🙏
Deleteखरंय 🙏
ReplyDelete