आणि बरंच काही- गणेशोत्सव
श्रावण सुरू होताच वेध लागतात ते गणरायाच्या आगमनाचे. श्रावण संपताच लगबग सुरू होते त्याच्या तयारीची. मराठी मनामनात हे दैवत अगदी ठाण मांडून बसलेलं... लाडकं. आगमनापासून ते विसर्जनापर्यंत त्याच्या सरबराईत दिवस कधी निघून जातात कळतही नाही. घराघरात कोण कौतुक या बाप्पाचं...!
संपूर्ण महाराष्ट्रात, देशात, देशाबाहेर भाद्रपदमासी गणेशचतुर्थी सोहळा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. कोकणाने मात्र या सोहळ्याचं आपलं वेगळं वैशिष्ट्य आजही अबाधित राखलं आहे. कोकणी माणसाचं आणि गणपतीचं नातं जरा वेगळंच आहे. तो देव जरी असला तरी घरातलांच कुणीतरी एक आहे. तोही कोकणी माणसाचं आपल्यावरील प्रेम पाहून भारावून जात असेल.
गावाकडल्या चतुर्थीच्या आठवणी तरी किती...! नदीव्हाळात मारलेली डुबकी मुंबई विसरायला लावते...चार दिवसांसाठी का होईना चाकरमान्याची वर्षभराची तहान भागवते.. गावाबाहेर दूरदूरपर्यंत विखुरलेली आपली माणसं भेटतात, आरतीत दंग होतात, भजनात तल्लीन होऊन जातात, भजन संपल्यानंतर मिळणा-य बेसनच्या करंजीसाठी वाट पाहत बसतात... सध्या कोण काय करतंय... कोणाच्या घरात आजोबा जन्माला आलाय... कोणाच्या घरात लग्न झाली... कोणाच्या घरात यंदा कर्तव्य आहे... कात विड्यासंगे घरगुती चर्चा रंगतात. फुललेल्या बाजारात मारलेला फेरफटका... तरारून आलेल्या भाताच्या रोपांवरून फिरवलेला हात...रात्रीच्या अंधारात कुर्ल्या पकडण्यासाठी नदीव्हाळातून केलेली धडपड... कितीतरी आठवणींचं तो गाठोडं बांधत असतो. हा उत्सव संपल्यानंतर जड पावलांनी आपल्या कर्मभूमीत परत जाताना बरोबर घेऊन जाण्यासाठी. या आठवणी चाकरमान्यांना वर्षभर पुरतात....आणि पुढील वर्षीचे वेध लागण्यास कारणीभूत ठरतात. या आठवणींवरच तो पुण्यामुंबईत आपलं धकाधकीचं जीवन जगत असतो.
गेल्या वर्षी लॉकडाऊनचे कडक निर्बंध असल्या कारणाने चाकरमानी मुंबईतच अडकून पडला. शरीराने मुंबईत होता मन मात्र त्याचं देवघर, पडवी, खळं, पाटलं दार, पांदी, व्हाळ, नदी, हिरवा वाफा, बांधावरचा चाफा यातच घुटमळत होतं. मन मारणे म्हणजे काय हे गेल्यावर्षी चाकरमान्यांनी अनुभवलं. यावर्षी तो सगळी कसर भरून काढणार. तेही संयम पाळून...
सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
_विजय सावंत



खूप छान वास्तव आठवणी जागवल्यास.
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏
Deleteगणपती बाप्पा मोरया
ReplyDelete🙏
Deleteगणपती बाप्पा मोरया !🌷
ReplyDeleteमंगलमूर्ती मोरया !!🙏
🙏
Deleteखुप छान
ReplyDeleteधन्यवाद!🙏
Delete