कवडसा- आडवाटेवरील खजिना- १६, रामघळ, पाटण, सातारा
आडवाटेवरील खजिना- १६
रामघळ, पाटण, सातारा
चाफळचे श्रीराम मंदिर, शिंगणवाडीचा मारुती आणि शिवसमर्थ स्मारक पाहून झाल्यावर....
एव्हाना माझ्या मनाची तयारी झाली होती, रामघळीचे दर्शन घेण्याची. बारा पंधरा कि.मी. म्हणजे जास्तीत जास्त अर्धा तास लागला असता. मी त्या दिशेने निघालो. हा चाफळ पाटण रस्ता. उजवीकडे एक रस्ता उत्तर मांड धरणावर जातो. वाटेत दाढोली गाव लागतं. एका सुंदर निसर्गचित्रात जे हवं ते सगळं या परिसरात आहे. दाढोलीच्या आधी एका काकांनी हात दाखवला. गाडीत बसले. पुढे त्यांना नातेवाईकाच्या कार्याला जायचे होते. गप्पांच्या ओघात त्यांनी रामघळीची थोडीशी माहिती पुरविली. म्हाबळवाडीच्या अलिकडे डावीकडे जाणारा रस्ता सरळ रामघळीपर्यंत जातो. पुढे ते दाढोलीत उतरले.
रस्त्यावर गाड्यांची वर्दळ नगण्यच. चाफळ ते दाढोली सरळ सपाट रस्ता होता, पहिल्यांदाच या रस्त्यावरून चाललो होतो, त्यामुळे रस्त्याचा अंदाज नव्हता. दाढोली मागे टाकताच अचानक समोर भिंत यावी तसा आता मी म्हाबळवाडीचा घाट चढत होतो, असा काही घाट लागेल याची कल्पना कोणीच दिली नव्हती. ऊंच डोंगर माझ्या नजरेसमोर आणि त्याच्या डोंगररांगांनी बाहू पसरून आपल्या कवेत घेतलेला दाढोली चाफळ परिसर. घाट चढायला सुरुवात करायला आणि पावसाने जोर धरायला एकच गाठ. हा खड्या चढीचा घाट चढताना मी प्रवासाचा मनसोक्त आनंद लुटत होतो. उजवीकडे उतरत्या शेतवाफ्यांची नक्षी सुंदर दिसत होती. नजर जाईल तिथवर निसर्गाची रेलचेल.
काही वेळाने घाटमाथ्यावर म्हाबळवाडीला पोचलो. वीस पंचवीस उंबर्यांची वाडी. पावसात चिंब भिजलेली. त्यामुळे घराबाहेर कोणी नाही. गाडी थांबवून चौकशी करायचे ठरवले. एक ताई दिसत होत्या, हलका पाऊस पडत होता, गाडीतूनच त्यांना विचारले “रामघळीला कसं जायचं?" त्या सांगत असतानाच पाठीमागून त्यांचे यजमान आले. मी रामघळीत चाललोय म्हटल्यावर तेच स्वत:हून माझ्याबरोबर येतो म्हणाले; सोबत आणखी एकाला घेतले. माझ्यासाठी बरंच झालं. ते बरोबर असल्यामुळे आता रामघळ शोधण्याचा प्रश्न नव्हता.
चाफळहून येताना म्हाबळवाडीच्या थोडसं अलिकडून एक कच्चा रस्ता डावीकडे जातो; ते गाडीत बसल्यावर आम्ही निघालो. कच्चा रस्ता पावसामुळे खराब झाला असण्याची शक्यता असल्यामुळे जिथपर्यंत गाडी जाऊ शकते तिथपर्यंत जायचं आणि पुढे चालत जायचं असं आम्ही ठरवलं. तो कच्चा रस्ता आणि आजूबाजूचा परिसर खूपच सुंदर होता. समोर अचानक धुक्यात लपणारी वाट... उजवीकडे आपल्या अंगाखांद्यावरून पावसाला वाट करून देणारा ओलेता डोंगर...डावीकडे खोल दरी... त्यापलीकडे दिसणारा दाढोली चाफळचा नयनरम्य परिसर. सुंदर!
काळ्या पुंकेसरांमुळे पाकळ्यांवर गोंदण केलंय की काय असे वाटणारी पांढरी रानफुलं तिथल्या सौंदर्यात आणखी भर घालत होती. गुलाबी नाजूका तर मनमोहक.
त्यातल्या त्यात मी गाडी बरी चालवतो त्यामुळे तो कच्चा रस्ता लिलया पार करून गाडी थेट श्री समर्थ नगरात पठारावर थांबवली. मोजकीच घरं. साधीसुधी. पठारही पार चिंब भिजलेलं.
डावीकडची दरी आणि उजवीकडच्या डोंगराची कडा संपवून जेव्हा पठारावर प्रवेश केला, अवाक व्हायला झालं ते पठार पाहून. एका सपाट भल्यामोठ्या हिरव्याकंच भूप्रदेशावर मी आलो होतो, एकाचवेळी किती तरी फुटबॉलचे सामने भरवता येतील असं. मधेच धुक्याची दुलई बाजूला सारून लहान बाळासारखं दर्शन देणारं. समुद्रसपाटीपासून अंदाजे चार हजार फूट उंच. दक्षिणोत्तर पसरलेलं.
रामघळीच्या जरा अलिकडे गाडी पार्क केली. शंभरऐक पावलं चालल्यावर एक वाट खाली उतरते. थोडा वेळ तिथे थांबून समोरचा चाफळहून निघाल्यापासूनचा गाडीच्या पाठीमागे पळू पाहाणारा निसर्ग नजरेत कैद करू लागलो. इथूनच डावीकडच्या कातळावर विसावलेल्या भल्यामोठ्या शिळेच्या खालच्या बाजूस निमुळती वाट रामघळीत उतरते.
रामघळ, समर्थ रामदास स्वामी या घळीत ध्यानधारणा करीत असत. समर्थांच्या ध्यानधारणेची सर्वच ठिकाणे निसर्गाच्या सौंदर्याने नटलेली आहेत. त्यांपैकी हे एक. नैसर्गिकरित्या तयार झालेली ही घळ बर्यापैकी मोठी आहे. काही ठिकाणी आकार देण्यात आला आहे. सुंदर, शांत, अतिशय स्वच्छ आहे. समोरच्या विहंगम परिसरावर नजर ठेवू शकणारी, सहजासहजी लक्षात न येणारी आणि इथे बसल्यास मनाला समाधान देणारी आहे. जवळच कुबडी तिर्थ आहे. घळीतून दिसणारं निसर्गाचं पावसाळी रूप शब्दातीत आहे.
असे म्हणतात, इथून भुयारी मार्ग थेट चाफळच्या श्रीराम मंदिरापर्यंत जातो. तो आता काळानुरुप किंवा १९६७ च्या भुकंपानंतर बंद आहे. पठारावरून चारही दिशांचा दिसणारा विस्तृत प्रदेश आणि या घळीचं नैसर्गिक व भौगोलिक स्थान पाहून वाटले कधी काळी ‘जय जय रघुवीर समर्थ' च्या जपाने इथले वातावरण प्रफुल्लित झालेले आहे, तर कधी इथला आसमंत ‘हर हर महादेव' च्या घोषणांनी दुमदुमून गेला असेल.
छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामींच्या भेटीची आठवण म्हणून इथेही एक स्मारक उभारण्यात आले आहे, तसेच छोटासा व्यू पॉइंट तयार करण्यात आला आहे.
पठारावर येऊन तो सगळा नजारा डोळ्यात पुन्हा साठवून म्हाबळवाडीला निघालो. गाडीत इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु होत्या; यावेळी पावसामुळे शेतीचं खूप नुकसान झाल्याचं कळलं. त्यानी सांगितलं, “आता तुम्ही आलात त्याच मार्गे माघारी जायची गरज नाही, इथून सड वाघापूर, तारळे मार्गे सातार्याला जाता येते." त्यांना सोडून पुढे निघालो. इथेच सडा वाघापूरचे पठार लागते, पावसाळ्यात सखल भागात पाणी साचून तळी तयार होतात. पाऊस जास्त प्रमाणात पडत असल्यास तळी ओसंडून डोंगरकड्यावरून वाहू लागतात. हो! इथेच आहेत ते reverse waterfall, उलटे धबधबे!


Very good information
ReplyDeleteNice one
Keep on doing.
मनःपूर्वक धन्यवाद!🙏
Deleteखूप छान
Deleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏
Deleteअप्रतिम ! अप्रतिम !! अप्रतिम !!!
ReplyDeleteफोटो तर 'न बोलवे काही'
चिंब- चिंब न्हालो.
आडवाटेवरचा खजिना आम्हापुढे उघडल्याबद्दल धन्यवाद विजय सावंतसर 🙏
मनःपूर्वक धन्यवाद!🙏
DeleteVery nice
Deleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏
Deleteजय जय रघुवीर समर्थ. विजय खुप छान सफर घडवली आहेस, राम घळी ची. तुझा थोडा हेवा वाटतो आणि असे अनेक आडवाटेवरची खजिने तू आमच्यासाठी उघडत राहावेस आणि आम्ही ते तुटत राहावे अशी इच्छा व्यक्त करतो. पुढील सर्व आनंदी सुरक्षित प्रवासासाठी तुला शुभेच्छा.
ReplyDeleteधन्यवाद
शैलेश कोडोलीकर
मनःपूर्वक धन्यवाद मित्रा!🙏
Delete