कवडसा- आडवाटेवरचा खजिना- १५, श्रीराम मंदिर, चाफळ

आडवाटेवरचा खजिना- १५

श्रीराम मंदिर, चाफळ, सातारा       

          कराड मागे सोडून सातार्याच्या दिशेने निघालो होतो. रात्रीचे दहा वाजले होते. दुसर्या दिवशी सातार्यात काम होते. कराड - सातारा रस्त्यावर उंब्रजला मुक्काम करायचं ठरवलं. चेक-इन करताना स्वागतकक्षातल्या मुलाला विचारलं “ इथे जवळपास काही पाहाण्यासारखं आहे का? पुरातन मंदिर वगैरे!"  काही क्षण अं अं अं करत आठवून म्हणाला “इथून बारा कि. मी. वर चाफळला एक राममंदिर आहे, खूप जुनं आहे, मी पाहिले आहे, सुंदर आहे." 

         चाफळचं नाव उच्चारताच हे नाव कुठेतरी आधी ऐकलेले आहे असं वाटलं. स्मृतीपटलावर असलेलं. सातार्यात ज्यांच्याकडे काम होतं ते सकाळी अकरानंतर. उंब्रज ते सातारा अर्धा पाऊण तास, सहाला उठलो तर दहा वाजेपर्यंत चाफळ पाहाता येईल, वेळेचा हिशोब केला आणि झोपी गेलो.

            सकाळी सहा ऐवजी सात वाजले होते. बैंगलोर - पुणे महामार्ग सोडून डावीकडे चाफळच्या वाटेवर वळण घेतले. गुगी बरोबर होतीच. दोनेक कि.मी. मागे टाकल्यावर चाफळ रस्त्यावर निसर्गाने आपली चुणूक दाखवायला सुरवात केली. रस्त्याच्या दुतर्फा वृक्षांची विपुलता लक्ष वेधून घेत होती. जसजसं पुढे जात होतो तसा निसर्ग अधिकच नटत चालला होता. 

                    मंदिर परिसरात गाडी पार्क केली. चाफळला श्रीराम मंदिर आहे एवढंच त्या मुलाने सांगितले होते. त्यानंतर मी थोडसं गुगलून पाहिलं तेव्हा कळलं की हे तर समर्थ रामदास स्वामी स्थापित मंदिर आहे. या आधी मी सज्जनगडावर जाऊन आलेलो आहे; त्यावेळीच कधीतरी चाफळचं नाव स्मृतीपटलावर लिहिलं गेलं असावं. प्रसिद्ध कवी यशवंत यांचंही हे गांव. 


             नेहमीप्रमाणे आधी मंदिरात जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाईचं इतकं सुंदर रूप पहिल्यांदा पाहिलं. संगमरवरातल्या उभ्या मुर्त्या इतक्या सुंदर, देखण्या आणि जीवंत आहेत की काही वेळेसाठी त्यांच्यावरून नजर हटत नाही. त्यांच्या पुढ्यातली पोवळ्याच्या वर्णाची शाळीग्राम  पाषाणातली श्रीरामाची सुंदर मूर्ती लक्ष वेधून घेते. 

           स्वामींना झालेल्या साक्षात्कारानुसार अंगापूरला कृष्णेच्या डोहात सापडलेली ही श्रीरामांची मूर्ती स्वामींनी निसर्गरम्य चाफळला उत्तर मांड नदीच्या किनारी स्थापित केली. १९६७ च्या विनाशकारी भूकंपात या मंदिराची खूप हानी झाली होती. त्यानंतर मुंबईच्या मफतलाल यांनी नव्याने हे मंदिर बांधून जीर्णोद्धार केलेला आहे. शुभ्र पत्थरातील हे श्रीराम मंदिर खूप सुंदर आहे. त्यावरील शिल्पे लक्ष वेधून घेतात.








             स्वामींनी त्यावेळी श्रीराम मंदिराच्या समोर दास मारुती आणि पाठीमागे वीर मारुती मंदिराची स्थापना केली होती. स्वामींनी स्थापिलेल्या अकरा मारुती मंदिरांपैकी ही दोन.

               दास मारुती
             वीर मारुती

        रामदास स्वामींच्या बहात्तर वर्षांच्या आयुष्यकाळाचे दोन भाग केले तर दिसतं, पहिली बारा वर्षे जांब येथील बाल्यावस्था... त्यानंतर बोहल्यावर सावधान हा शब्द ऐकून तिथून ठोकलेली धूम थेट नाशिकला टाकळी या गोदावरी तीर्थक्षेत्री... तिथे अत्यंत उग्र तपश्चर्या... श्रीरामनामाचा १३ कोटि जप...पुढील बारा वर्षे काश्मीर ते कन्याकुमारी अखंड पायी तिर्थयात्रा. दुसर्या भागातली  शेवटची सहा वर्षे छत्रपति शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून  सज्जनगडावर वास्तव्य केल्यास उर्वरित आयुष्य चाफळ येथेच स्वामींनी समृद्ध केले. चाफळला आल्यावर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे स्वामींचं निसर्गप्रेम. मी शिवथरघळ, सज्जनगड, आणि आता चाफळ पाहिल्यावर  निश्चितपणे सांगू शकतो. रामदास स्वामींचं निसर्गावर असलेलं प्रेम काही औरच होतं. चाफळ खूप सुंदर आहे.

             स्वामींबद्दल अजूनही एक माहिती इथल्या त्यांच्या ध्यानगुंफेवर लिहिलेली आहे, ती म्हणजे स्वामींची लष्करी शिस्त.  भारतभरातल्या सर्व रामदासी मठाच्या मठाधिपतींना वर्षा दोन वर्षातून चाफळला येऊन आपल्या कार्याचा अहवाल द्यावा लागत असे. सक्तीचे होते. चाफळ हे रामदास स्वामींच्या कार्याचे महत्त्वाचे केंद्र होते. इथल्या ध्यानगुंफेत स्वामींच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्त भेटी होत असत . त्यांच्याबद्दल आजच्या भाषेत बोलायचं तर समर्थ रामदास स्वामी हे महान मॅनेजमेंट गुरू होते; त्यांचं व्यवस्थापन कौशल्य अप्रतिम आहे. त्यांनी स्थापिलेले मठ, मंदिरे, ध्यानसाधनेच्या घळी आजही सुस्थितीत असून उत्तमरित्या कार्य करीत आहेत. 


             परिसराची माहिती देणारे फलक जागोजागी लावण्यात आलेले आहेत; त्यामुळे इथे अजून पाहाण्यासारखं काय आणि कुठे आहे ते कळतं.

            श्रीराम मंदिरापासून जवळ दोनेक किलोमीटरवर समर्थ स्थापित शिंगणवाडीला तिसरा खडीचा मारुती आहे. विचार केला जवळच आहे तर जायला काय हरकत आहे. अर्ध्या तासात होईल परिसर फिरून. एकदा मनाला असं समजावलं की पाय आदेश निघाल्यासारखे वाट धरतात. 

               निघताना रस्त्यात एकाला कसं जायचं तेवढं विचारलं. त्यांनी व्यवस्थित समजावून सांगितले. त्यांनी सांगितल्या प्रमाणे वाट धरली. एका ठिकाणी दोन दिशांना जाणारा फाटा फुटला होता पण स्थळदर्शक पाटी असल्यामुळे खडी मारुतीची वाट धरायला अडचण आली नाही. 

            भुरभुरा पाऊस सुरु होता... अत्तरदाणीतून शिंपडावा तसा... सगळीकडे हिरवाई... निसर्ग ऐटीत होता. मी हळूहळू त्याचा आनंद घेत खडी मारुतीची ती सुंदर टेकडी चढू लागलो.  एका वळणावर येताच अचानक... समोरून चार पाच मोर दुडूदुडू धावताना दिसले, झालं...! माझी तर ब्रम्हानंदी टाळी लागली. वळणावरच्या उभ्या चढावर गाडी थांबवली... बाहेर आलो. आता मोरांची म्यॅव म्यॅव वाढली होती, कदाचित माझी चाहूल त्यांना लागली होती. गाडीतून बाहेर आल्यावर सभोवताली नजर फिरवली. ३६० अंशातला परिसर माझ्या नजरेच्या टप्प्यात होता आणि लक्षात आलं... मी मोरांच्या कॉलनीत उभा आहे. 

         एखादा खजिना सापडला असं मला वाटलं. विचार केला आधी खडी मारुतीचं दर्शन घ्यावं नंतर हा सुंदर परिसर फिरावा. गाडी थेट मंदिराच्या दारात जाते. समर्थ स्थापित त्या मंदिरातील मारुतीरायांचे दर्शन घेतले आणि बाहेर आलो, तोपर्यंत माझ्या मागोमाग मंदिराची देखरेख करणारे गावकरी आले. 

            समर्थ स्थापित शिंगणवाडी येथील खडीचा मारुती

               माझ्या डोक्यात अजूनही ‘दिल मांगे मोर!' मंदिराच्या मागच्या बाजूला गेलो. खालच्या बाजूला मोरांच्या फॅमिल्या शेतात फिरताना दिसल्या, मी जमेल तसे फोटो घेत होतो. तेवढ्यात ते काका आले, म्हणाले “ तो बघा एक मोर झाडावर बसला आहे." मी त्या दिशेला पाहिलं, अहाहा! काय ते दृश्य! काय तो थाट! काय तो नवाबी रुबाब! मी पाहातच राहिलो.









 या आधी मोर पाहिले होते पण कधी पिंजर्यात तर कधी कोल्हापूरहून फोंड्याला जाताना रस्त्याच्या बाजूला शेतात. गाडीतून उतरून त्यांना पाहायला जाईपर्यंत पसार झालेले असायचे. मनसोक्त असे कधीच नाही. अशा नवाबी थाटात, जणू सगळा परिसर आमचाच अशा आविर्भावात हुंदडणारे मोर पहिल्यांदाच पाहात होतो. चाहूल लागताच त्याने खाली झेप घेतली त्यावेळी तो अविस्मरणीय क्षण कॅमेर्यात कैद करता आला.

               काका म्हणाले “थांबा थोडा वेळ, एखादा पिसारा फुलवून दाखवेल." मी मोरांमध्ये गुंतलो हे काकांच्या लक्षात आले पण मनगटावरचं ते चक्रम चक्र सतत निघायची आठवण करून देत होतं. 

              मोराचं पिसारा फुलवण्यावरून माझी एक कधीही न विसरता येणारी आठवण आहे. सांगतो.

               अशाच एका रविवारी बायकोला आणि मुलांना घेऊन पनवेलजवळच्या कर्नाळा पक्षी अभयारण्यात गेलो होतो. रमतगमत आमचं पक्षीनिरीक्षण चाललं होतं. तिथे फिरणारे फक्त आम्हीच. इतर कुणीही नाही. आम्ही मोराच्या पिंजर्याजवळ आलो, इतक्या जवळून म्हणजे मधे फक्त पिंजर्याच्या तारा, पहिल्यांदाच बघत होतो. लांबलचक घोळदार पिसांचा मोर इतक्या जवळून पाहायला मिळतोय हेच आमचं भाग्य. काही कळायच्या आत साहेबांनी पिसारा फुलवला. नुसताच फुलवला नाही तर चक्क काही वेळ थुईथुई नाचूनही दाखवलं. आणि अचानक अंग सोडलं. आम्ही जागच्या जागी स्तब्ध. क्षणभर आम्हालाच कळेना हे काय घडलं. अद्भूत...! तो  पिसारा फुलवलेला आणि थुईथुई नाचलेला मोर  दहाबारा वर्षांपेक्षा अधिक काळ लोटूनही नजरेसमोरून जात नाही. त्याच्या पिसार्याची थर-थर जशीच्या तशी. आजही घरात त्याची आठवण काढली जाते.

              पाहुणे आले की नाचून दाखवायचं असं त्याला शिकवलं होतं की पिंजर्यात असल्याची व्यथा तो आमच्यासमोर मांडत होता?  त्याच्या त्या अनाकलनीय वागण्याचं उत्तर मी अजून शोधतोय. असो.

               चहूबाजूंनी सुंदर हिरवागार निसर्ग .‌.. भुरभुरा पाऊस...त्यात एक सुंदर टेकडी... टेकडीवर समर्थ स्थापित मंदिर..‌मंदिराच्या मागे सुंदर डोंगराचा बॅकड्रॉप... खाली पावसाचं पाणी साचून तयार झालेलं तळं... जणू हिरवाईत रुपेरी कोंदण... तळ्याभोवती मोरांचं सहकुटुंब विहरणं... झाडाच्या शेंड्यावर नवाबी थाटात मोरांचं असणं... अचानक चाहूल लागताच झाडावरून तो पिसांचा पसारा सावरत खाली झेप घेणं... हे अवर्णीय वर्णन मला इतपतच करता येतय. 

          एखादा अरसिक इथे आला आणि त्याला तिथे एक टेकडी, टेकडीवर देऊळ, सगळे मोर रानात फिरायला गेल्यामुळे एखादाच मागे राहिलेला आणि त्यामुळे उदास असलेला मोर दिसला आणि जर तो म्हणाला,  मोर नाही हो! तो माणूस म्हणाला “काय एक एक वर्णन करतात राव, इथे तर काहीच नाही." तर मी जबाबदार नाही.




              तिथून पाय निघत नव्हता पण मी निघालो, खाली आलो. मघाशी जो फाटा लागला होता त्यातला दुसरा रस्ता जातो छत्रपति शिवाजी महाराज आणि स्वामी समर्थांची चाफळला पहिली भेट ज्या ठिकाणी झाली तिथे. त्या भेटीची आठवण म्हणून तिथे स्मारक उभारण्यात आलेले आहे. शिवसमर्थ स्मारक. छत्रपति शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामींपुढे नतमस्तक होऊन मी तिथून बाहेर आलो. 

            शिवसमर्थ स्मारक

             अकरा इथेच वाजले . श्रीराम मंदिराच्या परिसरात माहितीफलकावर लिहिलेली एक आडवाट खुणावत होती. चाफळपासून फक्त दहा बारा कि. मी.वर असणारी, रामघळ.

_विजय सावंत

२३/०८/२०१९

फोटो - विजय सावंत


#chafal #chafalsatara #samarthramdasswami #veermaruti #dasmaruti

Comments

  1. सगळं वर्णन नितांत सुंदर मोराची माहिती तर अफलातून

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏

      Delete
  2. खुप सुंदर सचित्र वर्णन

    ReplyDelete
  3. सुंदर परिसराचे वर्णन इतके छान करतोस की... दिल मांगे मोर

    ReplyDelete
  4. छान अप्रतिम वर्णन केले आहेस

    ReplyDelete

Post a Comment