आणि बरंच काही- आणि पोपट ...

 आणि पोपट ...

          आमच्या कॉलनीत डझनभर पोपटांचा नेहमीच राबता असतो. रोज सकाळी आणि संध्याकाळी नेटच्या वायरवर त्यांची पोपटपंची चाललेली असते, कधीकधी इतकी ओरड करतात... ज्याचं नाव ते!

         आज घरीच होतो, पोपटांचा खूप आरडाओरडा चालला होता म्हणून खिडकीत आलो. पोपट का आरडाओरडा करताहेत पाहू लागलो. पाहतोय तर समोरच्या बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावरील एक व्यक्ती बेडरूमच्या खिडकीतून दुसऱ्या दिशेला असलेल्या एसी विंडोजच्या जाळीत द्रविडी प्राणायाम करत होता. नीट निरखून पाहिलं तेव्हा लक्षात आलं, एसी विंडोच्या जाळीमध्ये एका पोपटसाहेबांनी आपली मान अडकवून घेतली होती. बाहेरून हात घालून त्याला सोडवण्याचा त्या व्यक्तीचा प्रयत्न निष्फळ ठरला. ज्याची मान अडकली होती तो गप्पच होता... घाबरला होता, पण बाकीच्या साथीदारांनी एकच कल्ला केला होता. एव्हाना पोपट जाळीत अडकला आहे हे त्या बिल्डींगमधील आणखी कुणाच्यातरी लक्षात आले होते. सहाव्या मजल्यावरील बेडरूमच्या मुख्य खिडकीतून एसी विंडोच्या जाळीमध्ये अडकलेला पोपट काढण्याचा एक अयशस्वी प्रयत्न झाल्यावर...मनात आले, फायर ब्रिगेड वाल्यांना बोलावलं तर...! हा विचार मनात येईपर्यंत अख्खाच्या अख्खा एसी हलताना दिसला. दोघे तिघे मिळून त्या पोपटाला सोडविण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी तो एसी आतल्या बाजूने खाली उतरवला. वाटलं आता पोपटाला सोडवणं सहजशक्य आहे, पण काहीशा विचित्र पद्धतीने त्याची मान पत्र्याच्या छिद्रात अडकली होती. पोपटाला सोडविणारी व्यक्ती अतिशय संयम राखून प्रयत्न करत होती. तोपर्यंत पोपट अडकला ही गोष्ट आणखी पोपटांना कळाली होती. बाजूच्या तारेवर आता त्याचा गोतावळा जमा झाला होता. त्यांच्यातला एक पोपट अडकलेल्या पोपटाला सज्जावर बसून वाकून वाकून बघत होता. वेगळ्या पद्धतीने आवाज काढत होता. ते आवाज नेहमीच्या आवाजापेक्षा वेगळे होते. आपल्या भाषेत अडकलेल्या पोपटाशी तो संवाद साधत होता. त्याच्यापासून दूर जात नव्हता... जणू सांगत होता.... आम्ही आहोत, तू काळजी करू नकोस, धीर धर. इतर पोपट हौसला अफजाईसाठी आले होते, पण हा एक पोपट मात्र जास्तच काळजी करत होता. अडकलेल्या पोपटाची जोडीदार असावी बहुधा...!

       अडकलेल्या  पोपटाची सुटका होत नाही तोपर्यंत इतर पोपटांनी ओरडून ओरडून कॉलनी डोक्यावर घेतली. मधेच उठून इमारतीला गिरकी घेऊन ते पुन्हा तारेवर येऊन बसत होते. सारेच अस्वस्थ झाले होते. पोपटांच्या प्रत्येक कृतीचं आणि त्यांच्या वागणुकीचं मी निरिक्षण करत होतो, सोबत फोटोही घेत होतो. ‘पक्षांमध्ये' उचंबळून आलेल्या भावनांचे दर्शन मला झाले. दहा-बारा मिनिटांच्या संयमी प्रयत्नानंतर पोपटाला सोडविण्याचा प्रयत्न करणार्या त्या व्यक्तीने सुटकेचा निःश्वास सोडला...आणि मीही... अडकलेल्या पोपटाने अखेर खाली झेप घेतली. आणि पोपट उडाला...!  त्याच्याबरोबर इतरही त्याच्या मागून उडून गेले. 

      आता त्याची चांगलीच खरडपट्टी चालू असणार...! 

धन्यवाद पक्षीमित्रांनो! 🙏

_विजय सावंत

१७/०९/२०२१

घटना आजचीच, दुपारी एकची.











    हाच तो!

Comments

  1. विजय दादा मस्त, सुंदर मांडणी आणि उत्कृष्ट लेखन,

    ReplyDelete
  2. मनःपूर्वक धन्यवाद!🙏

    ReplyDelete
  3. सावंत साहेब खूप छान लिहिले आहे. फोटो उत्तम काढले आहेत. सुंदर😍💓 🙏😂🐦🐦🐦

    ReplyDelete
  4. शीर्शकातच पोपटी उडाला लीहिलेस...पोपट सुटणार हे पण माहित होते...तरी पण वाचताना जीव सारखा वर खाली होत होता पोपटाच्या काळजीने....
    हि कमाल तुझ्या लेखणीची....

    ReplyDelete
  5. खूप छान निरीक्षण, लेखन , मांडणी आणि फोटोज

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏

      Delete
  6. उत्सुकता वाढवणारी पोपटपंची 👌🏻

    ReplyDelete
  7. उत्कंठावर्धक घटनेचे यथार्थ वर्णन, विजयजी फार छान !

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻

      Delete
  8. बापरे
    पण तू खूप छान वर्णन केलंस

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!

      Delete

Post a Comment