कवडसा- आडवाटेवरचा खजिना १३- श्री काशी विश्वनाथ मंदिर
आडवाटेवरचा खजिना- १३
श्री काशी विश्वनाथ मंदिर, गंगाघाट
काशी/ वाराणसी/ बनारस
उत्तर प्रदेश
दोन लशींची मात्रा पूर्ण झाल्यानंतर आणि सारे सरकारी नियम पाळत नुकताच वाराणसी अर्थात बनारस अर्थात हिंदू संस्कृतीचं सर्वोच्च तीर्थक्षेत्र काशी येथे जाऊन आलो. पंडित दिनदयाळ उपाध्याय जंक्शनला(मुगलसराय) सकाळी साडेदहाला उतरलो. गंगाघाटावर एखाद्या हॉटेलमध्ये थांबावे असे आधी ठरवले होते, पण रेल्वेस्थानकाच्या जिन्यावरून उतरत असताना लक्ष एका रेल्वेच्या स्वागतकक्षाकडे गेले. वाराणसीचे महत्व लक्षात घेता रेल्वे विभागाने यात्रेकरूंसाठी रेल्वेस्थानकात राहाण्याची उत्तम सोय केली आहे. ती कशी आहे ते पाहिले, चांगली आणि परतीच्या प्रवासाला सोईस्कर वाटली म्हणून तिथेच राहायचे नक्की केले. मुगलसराय ते काशी विश्वनाथ मंदिर हे अंतर आहे १६ कि.मी.
एक वाजेपर्यंत फ्रेश होऊन बाहेर पडलो. रेल्वेस्थानकाला लागून जो रस्ता आहे तो थेट वाराणसीला जातो. त्या गजबजलेल्या रस्त्यावर जेवणाची काही सोय होते का पाहिली. थोडी पायपीट केल्यावर मुंबईसारखंच एक नीटनेटकं हॉटेल दृष्टीस पडले. जेवणाचा कार्यक्रम उरकून तिथेच काऊंटरवर बसलेल्या मालकाला काशीला कसे जावे असे विचारल्यावर त्याने छानपैकी समजावून सांगितले. मुगलसराय ते वाराणसी प्रवासासाठी मुबलक प्रमाणात शेअर ऑटो उपलब्ध असतात. साधारण तासाभरात मी वाराणसीत पोचलो.
वाराणसी हे जगातील प्राचीन शहरांपैकी एक आहे. असं मानतात की भगवान शंकरांनी ५००० वर्षांपूर्वी हे शहर वसवले. काशीला गंगा नदी चंद्रकोरी वळण घेते आणि उलट्या दिशेने दक्षिणेकडून उत्तरेकडे प्रवाहित होत पुढे बिहारमध्ये प्रवेश करते. जिथे तिने चंद्रकोरी वळसा घेतला त्याच्या उत्तरेला वरुणा तर दक्षिणेला असी नदी तिला येऊन मिळतात. वरुणा आणि असी या दोन नद्यांच्या मधला गंगाकाठचा प्रदेश म्हणजे वाराणसी. वाराणसी म्हणजे हिंदू संस्कृतीचा आरसा. जगभरातून संस्कृती अभ्यासक वाराणसीला येत असतात. स्कंदपुराण, महाभारत, तसेच रामायणात काशीचा उल्लेख आढळतो. बारा ज्योतिर्लिंगांपैकी काशी विश्वनाथाचे महत्व हिंदू धर्मात अधिक आहे.
काशीबद्दलची उत्सुकता, लहानपणी श्रावणबाळाची गोष्ट ऐकली होती तेव्हापासूनची. ती वाढवली मोदींच्या निश्चित झालेल्या वाराणसी उमेदवारीने. त्यावेळी आजतकवर सतत वाराणसी मतदार संघाचं दर्शन... तिथली संस्कृती... गंगा घाट... संध्याकाळी होणारी गंगा आरती... हे दाखवले जायचे, ते पाहिल्यावर वाटायचं काशीला एकदातरी भेट नक्की द्यायची! कामानिमित्ताने त्याबाजूला गेलो असताना अगदी सहज हा योग जुळून आला.
वाराणसी हे अत्यंत गजबलेले शहर. रेशमी बनारशी साड्या, उच्च दर्जाचे अत्तर यासाठी वाराणसी प्रसिद्ध आहे तसेच काही अनमोल रत्नांसाठीही, वाराणसीतील काही अनमोल रत्ने- कबीर, वल्लभाचार्य, रविदास,स्वामी रामानंद, शिवानंद गोस्वामी, मुंशी प्रेमचंद, जयशंकर प्रसाद, पं.रविशंकर, गिरिजादेवी, पं. हरिप्रसाद चौरसिया, उस्ताद बिस्मिल्ला खाँ साहेब, इत्यादी. तसेच वाराणसी ‘मंदिरांचे शहर', ‘भारताची धार्मिक राजधानी', ‘भगवान शिव की नगरी', ‘दिव्यांचे शहर', ‘ज्ञान आणि कला नगरी' म्हणूनही प्रसिद्ध आहे.
ऑटोवाल्याने मंदिराजवळ एका वर्दळीच्या चौकात आणून सोडले. इथून पुढे मंदिरात जाईपर्यंत चप्पे चप्पे पर पोलीस तैनात होते. मुंबादेवी परिसराची आठवण यावी अशी बाजारपेठ. गंगा किनारी बाजीराव पेशवे यांनी बांधलेल्या दशाश्वमेध घाटाजवळ काशी विश्वनाथाचे मंदिर आहे.
आज जे श्री काशी विश्वनाथाचे मंदिर उभे आहे ते अहिल्याबाई होळकर यांनी १७८० साली निर्मिले आहे. मूळ मंदिर प्राचीन काळापासून इथे हिंदू संस्कृतीची साक्ष देत उभे होते. १४४७ साली मुस्लिम आक्रमकांनी पहिल्यांदा हे मंदिर पाडले. त्यानंतर १५८५ साली अकबराच्या आदेशानुसार दक्षिणेकडील विद्वान नारायण भट तसेच अकबराचे वित्त मंत्री तोडरमल यांनी विधिवत या मंदिराचे पुनर्निर्माण केले. १६३२ साली शहाजहान ने पुन्हा ते तोडण्याचा प्रयत्न केला. हिंदूंच्या एकजूटीमुळे ते अबाधित राहिले. पण इतर ६३ छोटीमोठी मंदिरे मात्र त्यावेळी पाडण्यात आली. त्यापुढील काळात धर्मांध औरंगजेबाने हे मंदिर पाडण्यासाठी आपल्या सैनिकांना आदेश दिला. २ सप्टेंबर १६६९ रोजी मंदिर पाडल्याचा खलिता औरंगजेबाला मिळाला. आजही तो दस्तावेज कलकत्ता येथे उपलब्ध आहे. अहिल्याबाई होळकर निर्मित आज उभ्या असलेल्या या मंदिराला, शेर ए पंजाब राजा रणजित सिंह यांनी १८५३ साली १००० किलो सोने अर्पण केले. या मंदिराची शिखरे सोन्याने मढवलेली आहेत. मुख्य मंदिर सुंदर असून शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. गाभाऱ्यात विश्वनाथाच्या पिंडीवर गंगेच्या पाण्याचा सतत जलाभिषेक होत असतो. वाटले नव्हते इतक्या विनासायास दर्शन घेता आले. मंदिराच्या परिसरात नवीन बांधकाम सुरू आहे. त्याच्या शीळा आणि इतर साहित्य आवारातच पडून आहेत. मंदिर चारही बाजूंनी तटबंदीने संरक्षित करण्यात आले आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतो. मूळ मंदिर जिथे होते तिथे आता ज्ञानव्यापी मस्जिद उभी आहे. मस्जिद आणि मंदिराच्या मधे मोठी विहीर आहे. ज्ञानव्यापी मस्जिद आणि मंदिर यांच्यात जागेसंबंधी कित्येक वर्षांपासून कोर्टात खटला चालू होता. त्याच दिवशी मोबाईल वर एक महत्वपूर्ण बातमी झळकली. खटल्याचा निकाल लागला, मंदिराला जी जागा हवी आहे ती मस्जिदने द्यावी आणि त्या बदल्यात तेवढीच जागा मंदिराने मस्जिदला द्यावी असे ठरले. जागा विकण्यास मनाई असल्या कारणाने अदलाबदली शिवाय पर्याय नव्हता. कोर्टाने त्यास मान्यता दिली. आणि बर्याच वर्षांपासून चाललेला हा वाद संपुष्टात आला. काही वर्षांनी काशी विश्वेश्वरच्या मंदिराचे नवे देखणे रूप पाहावयास मिळेल.
मुख्य मंदिराच्या पश्चिमेला अन्नपूर्णा देवीचे मंदिर आहे. दर्शन घेऊन मी बाहेर आलो. तिथून मोर्चा वळवला गंगा घाटाकडे. गंगेच्या पश्चिम किनाऱ्यावर ८४ घाट बांधण्यात आले आहेत. घाट म्हणजे गंगेच्या पाण्यात गंगास्नानासाठी उतरण्यासाठी आणि पूजाअर्चा करण्यासाठी दगडी पायऱ्यांची करण्यात आलेली सोय. हे घाट सलग असून एका घाटावरून दुसऱ्या घाटावर जाता येते. समोर गंगेचं विस्तिर्ण पात्र तिच्या भव्यतेची ओळख करून देते. कोरोनाकाळ असूनही वर्दळ लक्षणिय होती. ध्वनिक्षेपकावरून पर्यटकांसाठी सूचना सतत चालू होत्या. ती गंगा...ते दगडी पायऱ्यांचे घाट... घाटावर बांधण्यात आलेली मंदिरं... वर डोकावू पाहाणारी त्यांची शिखरं... संस्थानिकांचे वाडे... पाण्यात हेलकावे खात असलेल्या लहान-मोठ्या होड्या...गंगेच्या प्रति लोकांचं असलेलं प्रेम...समोर खुला आसमंत... एक असीम उर्जा होती तिथे. ते सगळं न्याहाळत असताना एक होडीवाला जवळ आला. म्हणाला,“साहब, चलो घाट घुमा के लाता हूं" त्याच्याबरोबर पैशाचं नक्की केलं आणि त्या ८४ घाटांच्या सफरीवर निघालो. मघाशी घाटावर उभे राहून जे काही न्याहाळत होतो त्यापेक्षा हे वेगळे होते. गंगेच्या पाण्यात राहून आता मी घाटांचं दर्शन घेत होतो. आणि तो एक वेगळाच अनुभव होता. घाटावर जुन्या काळात बांधलेले राजेरजवाड्यांचे किल्लासदृश वाडे लक्ष वेधून घेत होते. काही महत्वाच्या घाटांची त्या नावाड्याने माहिती पुरवली. अस्सी घाट, दशाश्वमेध घाट, हरिश्चंद्र घाट, चेतसिंह घाट, सिंधिया घाट, तुलसी घाट, भोसले घाट, राजघाट, बाजीराव घाट, हे काही महत्वाचे घाट. यापैकी हरिश्चंद्र घाट आणि मणिकर्णिका घाट हे अंत्यविधीसाठी वापरले जातात. चोवीस तास इथे अंत्यसंस्कार सुरू असतात. इतर घाटांवर गंगास्नान आणि पूजाविधी केले जातात.
संध्याकाळ झाली होती. मला ज्याची उत्सुकता होती ती गंगा आरती ठीक सात वाजता सुरू झाली. दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीसाठी भलेमोठे सात पाट मांडलेले आहेत. सध्या कोरोनाकाळ असल्याने ही आरती एकाच पाटावर मांडली होती. काशी विश्वनाथाच्या दर्शनानंतर जर तिथलं दुसरं कोणतं मोठं आकर्षण असेल तर ते गंगा आरती. देशाच्या वेगवेगळ्या भागातून आलेले तसेच स्थानिक मिळून जवळजवळ दोन-अडीच हजाराचा समुदाय आरतीच्या वेळी उपस्थित होता. धुपारती, दीप आरती ओवाळून पुष्पांजली अर्पण करून पारंपरिक वाद्यांच्या साथीने ही भव्य आरती संपन्न होते. तासभर चालणार्या या आरतीचा भाग होणे हा एक रोमांचकारी अनुभव आहे. मोठमोठे सेलिब्रिटी, विदेशी पाहुणे या आरतीसाठी हजेरी लावतात. उत्तर भारताच्या संपन्नतेत जिचा मोलाचा वाटा आहे त्या गंगेच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची याहून चांगली पद्धत आणखी काय असू शकते...!
हर हर गंगे!
_विजय सावंत
स्थळभेट- २३/०७/२०२१
माहिती स्रोत- गूगल, स्थानिक रहिवासी, अधिकृत स्थळदर्शक पाट्या
फोटो- विजय सावंत
#kashivishwanath #kashi #banaras #gangaghat






























👌👌👌🙏🏼
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteमूर्तीमंत वर्णन.
ReplyDeleteगंगा आरतीचा व्हिडिओ असल्यास अपलोड करावा.
धन्यवाद!🙏
DeleteVideo अपलोड केला आहे.
सुंदर स्थळ वर्णन आणि छायाचित्रे, खुप छान.
ReplyDeleteधन्यवाद!🙏
Deleteतीर्थयात्रेचा अलभ्य लाभ, दर्शन,पुण्य मिळाले.लेख मस्त!
Deleteतीर्थयात्रेचा अलभ्य लाभ,दर्शन,पुण्य मिळाले.
ReplyDelete🙏🙏👌
ReplyDeleteकाशी यात्रा घडवलीस ...मीत्रा...
ReplyDeleteपुण्य गाठीला बांधलस....
आता रामेश्वरम!
काशी यात्रा घडवलीस ...मीत्रा...
ReplyDeleteपुण्य गाठीला बांधलस....
आता रामेश्वरम!
काशीयात्रा घडवलीस... पुण्य गाठी बांधलेस...
ReplyDeleteआता रामेश्वरम!