आणि बरंच काही- जागतिक फोटोग्राफी दिवस

जागतिक फोटोग्राफी दिवस

      २००० साली फोनमध्ये पहिल्यांदा कॅमेरा समाविष्ट करण्यात आला आणि त्यानंतर त्याची लोकप्रियता एवढी वाढली की ०.११MP वरून आज सेलफोनचा कॅमेरा MP च्या बाबतीत नवनवीन उंची गाठताना दिसतो. एकमात्र झाले, त्याच्या सहज हातात असण्यामुळे सामान्यांतला फोटोग्राफर जागा झाला. प्रत्येक सेलफोनधारक कॅमेरामन झाला. मलापण त्याच्यामुळेच फोटोग्राफीचा छंद जडला. फोटोग्राफी म्हणजे पूर्वीच्या काळी(ऐंशी नव्वदच्या दशकात) सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट असायची. दुबई रिटर्न लोकांकडे किंवा काही मोजक्याच श्रीमंत लोकांकडे कॅमेरे असायचे. फोटोग्राफीच्या हौसेखातर १९९८ साली कोडॅकचा रोलवाला कॅमेरा घेतला होता. त्यावेळी तो ३६चा रोल कॅमेर्याच्या आत बसवायचा म्हणजे एक कलाच होती. त्यानंतर कितीतरी वेळा इतरांना ज्यांच्याकडे कॅमेरे आहेत पण रोल बसवता येत नाही अशांच्या कॅमेरात रोल बसवताना भाव खाऊन घेतला आहे. रीळ बरोबर बसली की नाही ते दोन-तीन वेळा तपासून पाहावं लागायचं. कारण काही चुकी झाली आणि रीळ पुढे सरकली नाही तर खापर रोल भरणार्यावर फुटायचं. हा भरलेला रोल काही एकाच कार्यक्रमात संपवायचा नसतो. दोन-तीन कार्यक्रमांसाठी तरी तो पुरवून पुरवून वापरायचा असतो. लक्ष काउंटरकडे, ३६च्यापुढे जेवढे फोटो काढता येतील ते बोनस. एकदा तो खटका/कॅमेर्याची कळ दाबायची बंद झाली की समजायचं रोल संपला. मग रिवाइंड करून तो काढायचा. पुढे कित्येक दिवस तो तसाच घरात पडून असायचा. ३६च फोटो येतील असं गृहीत धरून ४*६ मध्ये प्रिंट करायचे की ६*८मध्ये, मॅट की ग्लॉसी... त्याहिशोबाने पैशांचा बंदोबस्त झाला की रोल डेव्हलप करायला दिला जायचा. ज्या दिवशी फोटो मिळणार असतात तो दिवस म्हणजे एखाद्याला पहिल्यांदा आपली होणारी बायको पाहायला जाताना जी उत्सुकता असते तेवढ्याच उत्सुकतेने भरलेला. हुरहूर, बेचैनी, छातीत धडधड... तुम्हीच जर कॅमेर्यात रोल भरला असेल, तुम्हीच जर ते सर्व फोटो काढले असतील, आणि तुम्ही आता ते फोटो आणायला लॅबमध्ये जात असाल तर मी काय म्हणतो ते तुमच्या लक्षात येईल. कधी अख्याच्या अख्ख्या रोलने त्या फोटोग्राफरची वाजवलेली असते तर कधी ३६पैकी काहीच नाही तर दहा-बारा फोटोच हाती लागलेले असतात. पण जर ३६चे कधी कधी ३८ आले आणि तेही ठसठशीत अगदी हवे तसे तर मात्र तो आनंद जो आहे तो अवर्णनीय आहे. ज्याने रोलवाले कॅमेरे हाताळले आहेत त्यांनाच ठाऊक. असे कितीतरी आनंदी झोके मी त्यावेळी घेतले आहेत. त्यानंतर DSLR आले आणि हळूहळू रोलवाले कॅमेरे गायब होऊ लागले.

         आज फोटो काढणे सहजसाध्य झाले आहे. आजचे सेलफोनमधील  AI(Artificial intelligence) वाले कॅमेरे कुठल्याही वातावरणात छानच फोटो काढतात. पण काय काढायचं आहे हे ते सांगत नाहीत. त्यासाठी फोटोग्राफरचीच नजर हवी.

         आज जागतिक फोटोग्राफी दिवस आहे. त्यानिमित्ताने हे काही मी काढलेले फोटो तुमच्यापुढे सादर करतो आहे. आवडले तर जरुर कळवा.

_विजय सावंत

१९/०८/२०२१




































































Comments

  1. मी पण खुप मीस करतो तो रोल वाला केमेरा!

    सगळे फोटो खुप छान

    ReplyDelete
  2. खुप छान मनोगत

    ReplyDelete
  3. अती सुंदर फोटोग्राफी आणि माहिती.

    ReplyDelete
  4. फोटो आणि लेखन छानच

    ReplyDelete
  5. सुंदर फोटोज्. प्रकाशचित्रे हे नाव समर्पक आहे ह्याची प्रचिती आली. You have good photography sense. Bravo !

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏

      Delete
  6. तुमचे फोटो बोलके असतात.कॅमेर्‍यातुन कोकणदर्शन बघुदे.

    ReplyDelete
  7. ती धाकधुक पुन्हा जाणवली.

    ReplyDelete
  8. Fantastic Photos ❤

    ReplyDelete
  9. पुन:प्रत्ययाचा अनुभव !
    प्लेट फोटोग्राफी ते डिजिटलपर्यंत आणि स्थिर ते चलतचं तंत्र विकसित होतांना एनालॉग फोटोग्राफीचं कौशल्य कठीण होत जातंय. 📸

    ReplyDelete

Post a Comment