कवडसा- आडवाटेवरचा खजिना- १४, सारनाथ

 आडवाटेवरचा खजिना- सारनाथ, वाराणसी, उत्तर प्रदेश

         Light of Asia, अर्थात तथागत गौतम बुद्ध, राहून राहून सारखं वाटतंय, जगावर आलेलं दहशतवादाचं मळभ दूर व्हावं, बुद्धरूपी प्रकाश जगभर पोहचून सगळीकडे शांतता आणि प्रेम नांदावं.

          बौद्ध संस्कृतीची चार मुख्य स्थळे; लुंबिनी-नेपाळ, जिथे गौतम बुद्धांचा जन्म झाला; बोधगया- बिहार, जिथे बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली; कुशीनगर-उत्तर प्रदेश, जिथे बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले आणि सारनाथ- वाराणसी, उत्तर प्रदेश; जिथे ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर गौतम बुद्धांनी आपल्या पाच शिष्यांना सर्वप्रथम बौद्ध धम्माची दीक्षा दिली. हेच ते पहिले धम्मचक्र प्रवर्तन. बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसाराला इथून सुरुवात झाली. शांती, अहिंसा, प्रेम आणि दया ही मूलभूत तत्वे अंगिकारणार्या या धर्माचे अनुयायी आज जगभर पसरलेले आहेत.

        सारनाथचे जुने नाव मृगदाय, हे एक सुंदर वन होते आणि इथे मृगांचा स्वैर वावर होता. त्यामुळे त्याचे नाव मृगदाय प्रचलित झाले होते. पुढे इथे असलेल्या सारंगनाथ महादेवाच्या मंदिरावरून ते सारनाथ झाले असे कळते. सारनाथ हे गंगा आणि गोमती तिरावर वसलेले हिंदू, जैन आणि बौद्धधर्मियांचे एक महत्वाचे धार्मिक स्थळ आहे. जैन धर्माचे अकरावे तिर्थकर श्रेयांसनाथ यांचा जन्म इथलाच. वाराणसी ते सारनाथ अंतर आहे फक्त दहा किलोमीटर. काशी, वाराणसी म्हटलं की आपल्याला फक्त श्री काशी विश्वनाथ आणि गंगा घाट एवढेच माहिती असते. माझेही तसेच होते. पण  वाराणसीचा थोडासा अभ्यास केला तेव्हा या नवीन ठिकाणाची माहिती मिळाली. आणि मी वाट धरली या आडवाटेवरच्या खजिन्याची.

          सारनाथमध्ये प्रवेश करताच लक्ष वेधून घेते ती तिथली स्वच्छता, अशोककालीन स्तूपांची भव्यता आणि त्या परिसरातील शांतता. देशविदेशातील पर्यटक सारनाथला भेट देण्यासाठी येतात. ‌१९१० साली स्थापन करण्यात आलेले इथले पुरातत्व खात्याचे राजकीय वास्तुसंग्रहालय जगभरात प्रसिद्ध आहे. त्यात इसवी सन पूर्व तिसरे शतक ते इसवी सन बारावे शतक या कालखंडात उत्खननात सापडलेल्या गौतम बुद्धांच्या मूर्ती, तसेच इतर मूर्ती, शिल्पे, शिलालेख, भारताचे राष्ट्रीय चिन्ह ज्यावरून घेतले आहे त्या अशोकस्तंभाचे शीर्ष, अशोकस्तंभाचा भाग असलेले आणि राष्ट्रीय ध्वजात मध्यभागी स्थान मिळवलेले अशोकचक्र, त्यावेळी वापरात असलेल्या इतर वस्तू आणि कितीतरी अमूल्य ठेवा या संग्रहालयात पाहावयास मिळतो. 

          सारनाथ येथे हा जो बौद्धकालीन खजिना सापडला आहे त्याबद्दलची माहिती खूपच रोचक आहे. काशी नरेश चेतसिंह  यांचा दिवाणजी जगतसिंह याने १७९४ मध्ये अनावधानाने सारनाथ येथील धर्मराजिका स्तूपाच्या विटा काशीत जगतगंज नावाचा मोहल्ला उभारताना वापरल्या. त्याचवेळी इथे खूप मोठा प्राचीन खजिना दडलेला आहे हे जाणकारांच्या लक्षात आले. पुढे ब्रिटिश अधिकारी कर्नल कैंकजीने इथे उत्खनन करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्याला यश मिळाले नाही. त्यानंतर वीस वर्षांनी १८३५-३६साली ब्रिटिश अधिकारी अलेक्झांडर कनिंगहॅम याने उत्खननास सुरवात केली. त्यात त्याने धमेख स्तूप, चौखंडी स्तूप, मध्यकालीन विहार शोधून काढले. पुढे ब्रिटिश इंजिनिअर ओरटेल यांनी या जागेचे विस्तृत आणि वैज्ञानिक उत्खनन केले. २००५  साली पुरातत्व विभागाचे डायरेक्टर जनरल जॉन मार्शल आणि सहकारी दयाराम साहनी यांनी सारनाथ येथील उत्खननात प्रकाशात आलेल्या या खजिन्याचा जीर्णोद्धार केला. 

          चंड अशोक ते धम्म अशोक हा चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या आयुष्याचा थक्क करून सोडणारा अद्भूत प्रवास. अफगाणिस्तानपासून म्यानमार आणि हिंदुकुश पर्वतापासून मैसूरपर्यंत अखंड भारतावर राज्य करणारा, एकही युद्ध न हरणारा हा भारताचा महापराक्रमी चक्रवर्ती सम्राट. कलिंग युध्दात झालेली मनुष्यहानी पाहून उद्धीग्न झाला. युद्ध जिंकून नेमकं काय जिंकलं याचा विचार त्याला छळू लागला. या युद्धानंतर त्याने आयुष्यात युद्ध करणार नाही असे नुसते ठरवले नाही तर शांती, अहिंसा, प्रेम आणि दया ही मूलतत्त्वे असलेल्या बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. आपले संपूर्ण आयुष्य बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी खर्ची घातले. इतकेच नव्हे तर आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांनाही बौद्ध धर्मप्रसारासाठी भारताबाहेर पाठविले. बुध्दांच्या महापरिनिर्वाणानंतर सुप्तावस्थेत असलेल्या बौद्ध धर्माचा तीनशे वर्षांनी अशोकाने भारतभर तसेच भारताबाहेर, मिस्र, यूनान, आणि आशिया खंडात प्रसार आणि प्रचार केला. अनेक ठिकाणी स्तूप आणि अशोक स्तंभ उभारण्यात आले. त्यापैकी एक महत्वाचे ठिकाण म्हणजे सारनाथ. 

सारनाथ येथील काही महत्वाची स्थळे पुढीलप्रमाणे.

धमेख स्तूप 

         हा सारनाथमधील प्रमुख स्तूप. गौतम बुद्धांशी संबंधित काही वस्तू या स्तूपात ठेवण्यात आल्या होत्या. याच ठिकाणी गौतम बुद्धांनी आपल्या शिष्यांना सर्वप्रथम बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. इ.स.पू. तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाच्या काळात उभारण्यात आलेल्या स्तूपावर हा स्तूप निर्माण करण्यात आला. सम्राट अशोकाच्या काळात सुरुवात करण्यात आलेल्या या स्तूपाचा विस्तार कुषाणकाळात करण्यात आला आणि गुप्त काळात तो पूर्ण झाला. ९३ फूट व्यास आणि १४३ फूट उंच या भरीव स्तूपावर खालच्या बाजूला सुंदर नक्षीकाम केलेले आहे. स्वास्तिक, पाने, फुले, वेली, पक्षी आणि मानवी आकृत्या कोरण्यात आलेल्या आहेत. गुप्तकालीन शिल्पकलेचा हा सुंदर नमुना आहे. बौद्ध धर्मात धमेख स्तूप पूज्य मानतात. बौद्धधर्मीय या स्तूपाला प्रदक्षिणा घालतात.





चौखंडी स्तूप

सारनाथ येथील हा स्तूप पर्यटकांच्या आकर्षणापैकी एक महत्त्वाचा स्तूप आहे. गौतम बुद्ध आणि त्यांचे पाच साथीदार बोधगया येथे ज्ञानप्राप्तीसाठी साधना करीत होते. एके दिवशी सुजाता नामक स्त्रीकडून गौतम बुद्धांनी खीर ग्रहण केल्याचे समजल्यावर त्यांच्या पाचही साथीदारांनी गौतम बुद्धांची साथ सोडली. त्यानंतर ते सारनाथला येऊन राहिले होते. बोधगया येथे गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर ते सारनाथ येथे आले. गौतम बुद्ध सारनाथला येत आहेत हे समजल्यावर आधी तर त्यांच्या या पाच साथीदारांनी त्यांचे स्वागत करायचेच नाही असे ठरवले होते. पण जसजसे गौतम बुद्ध त्यांच्याजवळ आले, बुद्धांचे तेज त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी पुढे होऊन त्यांनी बुद्धांचे स्वागत केले तसेच त्यांच्याकडून बौद्ध धर्माची दीक्षाही घेतली.

        सारनाथ येथे चौखंडी स्तूपाचे निर्माण या भेटीप्रित्यर्थ गुप्तकाळात चौथ्या पाचव्या शतकात करण्यात आले आहे. या स्तूपाची उंची ९३ फूट आहे. त्यानंतरच्या काळात  या स्तूपावर निर्माण करण्यात आलेली एक अष्टकोनी मुघलकालीन संरचना  पाहावयास मिळते. ज्याच्या उत्तर दरवाजावर अरबी शिलालेख कोरलेला आहे. राजा तोरडमल यांचा पुत्र गोवर्धन याने हूमायूंचं स्वागत अविस्मरणीय करण्यासाठी म्हणून १५८८ साली याची निर्मिती केली. सातव्या शतकातील चिनी पर्यटक आणि अभ्यासक हुयान त्सांग याने सारनाथ हे एक समृद्ध शहर असल्याचे वर्णन केले आहे.



अशोकस्तंभ

      सारनाथ येथील चौमुखी सिंह स्तंभ हा सम्राट अशोकाने इ.स.पू. तिसऱ्या शतकात, विश्वगुरु तथागत बुद्धांच्या धर्म चक्र प्रवर्तन तसेच लोककल्याणकारी धम्माचे प्रतिक म्हणून स्थापन केला आहे. पंचेचाळीस फूट उंच वर पातळ होत जाणारा, दंडाच्या वर कंठ आणि कंठाच्या वर शीर्ष आहे. स्तंभात समाविष्ट असलेल्या बत्तीस पाकळ्यांचा धर्मचक्राला भारतीय ध्वजात मानाचे स्थान देण्यात आले आहे. 

         बुद्ध धर्मात सिंहाला विश्वगुरु तथागत बुद्धाचा पर्याय मानला गेला आहे. बुद्धाच्या पर्यायवाची शब्दांमध्ये शाक्यसिंह आणि नरसिंह असा उल्लेख पाली गाथांमध्ये आढळतो. यामुळे बुद्धाद्वारे उपदेशित धम्मचक्कप्पवत्तन ला बुद्धांची सिंहगर्जना संबोधतात. ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर बुद्धांनी आपल्या शिष्यांना बहुजनहिताय बहुजनसुखाय धर्मप्रचारार्थ चार दिशांना जाण्याचा आदेश दिला होता. आज दिसणार्या भारतीय राष्ट्रीय चिन्हात तीन सिंह दिसतात, खरे तर ते तीन नसून चार आहेत. 

          अशोकस्तंभाची मूळ जागा
           अशोकस्तंभ राष्ट्रीय वास्तुसंग्रहालयात जतन करून ठेवण्यात आला आहे. मूळ जागेत त्याचा खालचा भाग शिल्लक आहे. 




      मूलगंध कुटी विहार
         या विहाराचे वर्णन चीनच्या हुयान त्सांग याने आपल्या प्रवासवर्णनात केले आहे. त्यात त्याने २०० फूट उंच आणि तीन बाजूंनी प्रवेशद्वार, तसेच सुंदर नक्षीकाम असल्याचे नमूद केले आहे. मूळ विहार आज अस्तित्वात नाही, पण त्याच धर्तीवर १९३१ साली महाबोधी सोसायटी द्वारे निर्माण करण्यात आलेला सारनाथ येथील हा बौद्ध विहार.

      थाई मंदिर

     थाई मंदिर परिसरात उभारण्यात आलेली गौतम बुद्ध यांची ८० फूट उंचीची पूर्णाकृती.

     भारतीय पुरातत्त्व खात्याचे वास्तुसंग्रहालय 

          सारनाथची अजून एक ओळख आहे ती म्हणजे रेशमी साड्यांची बाजारपेठ, मा. पंतप्रधान मोदी यांनी इथल्या साडीउद्योगाला प्रोत्साहन दिले आहे. आजही इथे हातमागावर साड्या विणल्या जातात. त्यामुळे इथल्या गरिबातल्या गरीबाला रोजगार उपलब्ध झाला आहे. बनारस साडीसारखी  सारनाथ साडीही प्रसिद्ध आहे. अशाच एका साडी उद्योगाच्या फॅक्टरी आउटलेटला भेट दिली. हातमागावर साड्या कशा विणल्या जातात ते प्रत्यक्षात पाहता आले.


           भारत, खरोखरच एक महान देश आहे. मागे वळून जर या देशाच्या इतिहासात डोकावून पाहिले तर त्यावेळच्या त्याच्या संपन्नतेची आणि समृद्धतेची माहिती होते. भारतात कितीतरी राजघराणी होऊन गेली. महान सम्राट, योद्धे, होऊन गेले, जगातल्या महान योद्ध्यांमध्ये चक्रवर्ती सम्राट अशोकाचे नाव आजही अग्रक्रमाने घेतले जाते. या देशाच्या इतिहासात जितकं डोकावून पाहावं तितकी त्याची समृद्धता अधिकच उलगडत जाते.

_विजय सावंत

स्थळभेट- २४/०७/२०२१

फोटो- विजय सावंत 

माहिती स्त्रोत- गूगल, स्थळाची माहिती देणार्या अधिकृत पाट्या, वर्तमानपत्रातील लेख, विकिपीडिया

#sarnath

#gautambuddha

#ashokstambh

#dhamekhstupa

#chaukhandistupa

#mulgandhakutivihar

#varanasi

Comments

  1. अतिशय माहितीपूर्ण लेख आहे.
    धन्यवाद साहेब!🙏⚘

    ReplyDelete
  2. मस्त फोटो आणि माहिती. धन्यवाद विजय 🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment