आणि बरंच काही- मैत्रीचा नितळ रंग

 मैत्रीचा नितळ रंग

 मैत्री हे असं नातं आहे, की ते कोणाबरोबरही, कधीही, कुठेही, कुठल्याही परिस्थितीत जुळू शकतं. अहो! चक्क फोनवरूनही ते जुळू शकतं. या नात्याला कुठलंही बंधन नाही. आयुष्यात मित्र खूप भेटतात, लहानपणापासून तर अगदी उतारवयापर्यंत. त्यातले मोजकेच मनात घर करतात. ज्या मैत्रीत मनाचा तळ दिसेल अशी निखळ मैत्री लाभणं हे भाग्य. मित्रांशिवाय आयुष्यात मजा नाही. कट्ट्यावर पाच सहा मित्रांनी गप्पा मारता मारता सहज एखाद्या दूरच्या मित्राची आठवण काढावी... त्यानंतर गाडी काढावी... रात्री अडीज तीन वाजता दूर त्याच्या फार्महाऊसवर धडक मारावी आणि कुडकुणार्या थंडीत शेकोटी करून गप्पा हाणाव्यात....

मैत्री ही उनाड, रात्र जागवणारी, वेळेकाळाचं बंधन नसणारी, धमाल मस्तीत रंगणारी पण सावरणारी असावी.

सर्वांना फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा!

           

एकदा मी घेतला चितारायला 

माझ्या आयुष्याचा कॅनव्हास

भरले सगळे रंग

ठासून सगळे प्रसंग

उभ्या आडव्या रेषा अनुभवाच्या

टाकल्या डेप्थ भावभावनेच्या...

भरभर स्ट्रोक पडत गेले 

चित्र बनत गेले, तयार झाले.

सुंदर तर दिसत होते...

पण...!

पण वाटत नव्हते पूर्ण

राहून राहून वाटत होते

आहे काहीतरी अपूर्ण

काय ते काय ते...?

विचार केला काय असेल ते मर्म

ज्याने चित्र होईल हे पूर्ण...


हात्तीच्या...!

दिसलाच नाही हो एक रंग...!

माझ्यातच विरघळलेला...

टाकताच झाले चित्र पूर्ण

मैत्रीचा तो नितळ रंग.


_विजय सावंत

०१/०८/२०२१





Comments

  1. मैत्रीच्या रंगात रंगलेल्या शुभेच्छा मीत्रा

    ReplyDelete
  2. मैत्रीचे रंग विजय सावंत संग

    ReplyDelete

Post a Comment