आणि बरंच काही- जागतिक पर्यावरण दिन

 जागतिक पर्यावरण दिन

        A-76 Iceberg, गेल्या महिन्यात मेच्या मध्यावर अंटार्क्टिकापासून वेगळ्या झालेल्या या हिमनगाने, जगातील सर्वच प्रमुख वर्तमानपत्रांना पर्यावरणातल्या बदलाची पुन्हा एकदा नव्याने दखल घ्यायला भाग पाडले. १७० किलोमीटर लांब, २५ किलोमीटर रुंद आणि ४३२० स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रफळ असणारा हा अवाढव्य बर्फाचा डोंगर सध्या वेडेल समुद्रात तरंगतो आहे. जागतिक तापमानवाढीचा हा परिणाम.

      आतापर्यंत पर्यावरणावर बरेच लिहिले गेले आहे; तो किती संवेदनशील विषय आहे हेही एव्हाना सगळ्यांच्या लक्षात आले आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन त्यानिमित्ताने केले जात आहे. वर्तमानपत्रांची पाने त्या विषयाने ओसंडून वाहताना दिसत आहेत. पण तरीही पर्यावरणाचा र्हास हा होतच आहे. विसाव्या शतकात झालेली जागतिक तापमानवाढ हाही सध्या चिंतेचा विषय आहे. त्याचे परिणाम दिसू लागले आहेत.

          माणसाची निसर्गातली लुडबूड, त्याच्याकडून होणारे हरप्रकारचे प्रदुषण... झपाट्याने नष्ट होणार्या पशूपक्षांच्या जाती, झाडे, सूक्ष्मजीव, किटक... तसेच खनिज संपत्तीसाठी ओरबाडली जात असलेली जंगले, डोंगर, नद्या... कितीतरी कारणे आहेत जी पर्यावरणाचं संतुलन बिघडवत आहेत. अशावेळी निसर्गाचे वेळापत्रक जरा बदलले तर लोकं म्हणतात, ‘निसर्ग बदलला.' खरं तर निसर्ग तसाच आहे. दिलदार. बदलला तो माणूस. म्हणूनच म्हणावेसे वाटते...

बदलला काळ बदलले बरेच काही

बदलले वागणे माणसाचे, निसर्ग नाही


उगवतो आजही सूर्य पूर्वेला

गार वारे मावळताना पश्चिमेला

आहे भान अजुनी मोसमी वार्याला

माणसाला हे कधी कळलेच नाही


बदलला काळ बदलले बरेच काही

बदलले वागणे माणसाचे, निसर्ग नाही

असो....!

     पृथ्वीवर लाखो प्रजातीचे जीव व वनस्पती आहेत. सगळ्यांची विशेषता आणि निवास भिन्न आहेत, एकमेकांपासून कोसो खंडो दूर आहेत तरीही एका नैसर्गिक शृंखलेने सगळे एकमेकांशी बांधले गेलेले आहेत. जैवविविधतेने सर्वाधिक संपन्न जगातल्या बारा देशांमध्ये भारताचा समावेश आहे. जगातील माहिती असलेल्या ७.८% प्रजातींची नोंद आपल्याकडे आहे. पर्यावरणात होत असलेले बदल लक्षात घेऊन भारतात २००२ साली वनसंवर्धनासाठी कायदा करण्यात आला. महाराष्ट्रात २००८ साली जैवविविधता नियम लागू करण्यात आले. जैवविविधतेची रेलचेल असलेला पश्चिम घाट युनेस्कोच्या वारसास्थळांमध्ये सामील झालेला आहे. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर ज्यांनी भटकंती केली त्यांनी ही जैवविविधता खूप जवळून पाहिलेली आहे. सह्याद्रीने खूप काही दिले आहे महाराष्ट्राला. वनौषधींचा खजिना आहे सह्याद्री. सह्याद्रीच्या माथ्यावर उगम पावलेल्या नद्यांनी महाराष्ट्राची खोरी समृद्ध केली आहेत. कितीतरी दुर्मिळ प्राणी पक्षी आज फक्त सह्याद्रीच्या घनदाट जंगलात टिकून आहेत. सह्याद्रीचं हे मोल महाराष्ट्र जाणतो म्हणूनच असेल कदाचित महाराष्ट्रात तरी, पर्यावरणप्रेमींनी पर्यावरणस्नेही चळवळी उभ्या केलेल्या आहेत. पर्यावरणाच्या भल्यासाठी आजचा तरुण पुढाकार घेत आहे, ही कौतुकाची बाब आहे.

          पण दुर्दैवाने काही मुठभर स्वार्थी मनगटं या पर्यावरणातील जैवविविधतेला नख लावत आहेत. ‘आपलं कुणी काही बिघडवू शकत नाही' असा ग्रह करून घेतलेली एक जातकुळी जगात सगळीकडेच कार्यरत आहे. त्यांना पर्यावरण कशाशी खातात ते माहिती नाही, किंवा माहिती असूनही त्यांना पर्यावरणाचे काहीच पडलेले नाही, दिलेल्या कोट्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने निसर्गाला ओरबाडणे एवढेच त्यांना ठाऊक.    अशा लोकांपासून पर्यावरणातील जैवविविधतेला असलेला धोका लक्षात आणून देण्यासाठी, तसेच वसुंधरेच्या भल्यासाठी सामान्य माणूस किमान काय करू शकतो, याची जाणीव करून देण्यासाठी हा आजचा दिवस. जागतिक पर्यावरण दिन. जैवविविधतेतल्या घटकांची आर्त हाक जैवविविधतेचे तीनतेरा वाजवणार्यांच्या कानापर्यंत पोहचो आणि त्यांचे हृदयपरिवर्तन होवो, पर्यावरण अबाधित राहो, हीच या पर्यावरण दिनानिमित्त सदिच्छा. 

निसर्गचक्र

चक्र  गतीत असेल जोवर

तोवर तयाची महती थोर

चक्र घडविते घडा सुंदर

चक्र वाचविते कष्ट अपार


निसर्गचक्र चाले तत्पर

म्हणूनी जग हे आहे सुंदर

या चक्राविना सारे वायकळ

करो नये कधी निसर्ग विसाळ


_विजय सावंत

जागतिक पर्यावरण दिवस

०५/०६/२०२१

फोटो- विजय सावंत







#worldenvironmentday #जागतिकपर्यावरणदिवस, #vijaysawant #kathakavitakavadasa

Comments

  1. सुंदर शैली, अर्थपूर्ण विषय हाताळणी. आपल्या या लेखाचे मी फॅन झालोय. 🙏

    ReplyDelete
  2. 🌸🌱🌿🌺
    पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति । तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः
    🌸🌱🌿🌺
    सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामय:
    सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुख भागभवेत।
    🌸🌱🌿🌺
    जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा !
    🙏🏻

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻

      Delete
  3. प्रत्येकाने आयुष्यात एखादे झाड लावुन जगविले पाहीजे.तरच आयुष्य सार्थकी लागेल

    ReplyDelete
  4. खरच, किती आपण जपायला हवे या भूमातेला. एकमेव गोल या पूर्ण विश्वातला आणि माणुस नावाच्या राक्षस ला कधी तिला नष्ट करू असे झाले आहे.
    आपण आपल्या परीने जमेल तेवढे करू, aawhde जरी प्रत्येकाने केले तरी एकजुटीचा बळावर खुप काही होईल, या दिवसाच्या निमित्ताने.

    खुप छान विजय, नेहमीप्रमाणेच आणि अप्रतिम छायाचित्रे

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद मित्रा!🙏🏻

      Delete
  5. विजय जी
    ही लिंक आठवणीने पाठविण्यासाठी मनापासून धन्यवाद.
    तुम्ही असे लिखाण ब्लॉग मधून सातत्य ठेवून चालू ठेवा.
    सध्या थिंक महाराष्ट्र सोबत प्रवास सुरू केला आहे अर्ध वेळ असे त्यांच्या ठाणे येथील ऑफिस. तुम्ही ठाण्यात आलात तर भेटू तिथेच

    बिपिन हिंदळेकर
    ५.६.२५

    ReplyDelete

Post a Comment