कवडसा- आडवाटेवरचा खजिना-९, दुर्ग प्रतापगड
आडवाटेवरचा खजिना - ९
दुर्ग प्रतापगड, जावळी
जिल्हा - सातारा
जिजाऊंचे स्वप्न आकार घेत होते...
स्वराज्य विस्तारत होते...
स्वराज्यविस्तारासाठी जावळीवर ताबा मिळविणे महत्त्वाचे होते...
जावळीचं महत्व महाराज ओळखून होते...
चंद्रराव मोरे, विजापूरच्या आदिलशहाचे पिढीजात जहागिरदार, महाराजांकडून स्वराज्यात सामील व्हावे म्हणून मैत्रीचा हात पुढे...
झिडकारून ‘येता जावळी जाता गोवळी' मोरेंची ललकारी...
१६५६ साली महाराजांची निसणीच्या वाटेने जावळीवर स्वारी...
जावळी स्वराज्यात...
विजापूरात हाहाकार...
पुढच्या संकटाची महाराजांना चाहूल...
भोरप्याच्या डोंगरात मोरोपंत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षांत दुर्गप्रतापगड बांधून पूर्ण...
विजापूराच्या दरबारात शपथ घेतलेला अफजलखान मोठे घोडदळ, पायदळ, हत्ती, उंट, तोफांसह मोठी घमेंड मिरवत वाईत दाखल...
महाराजांना वाईत येण्यासाठी खलिता...
युध्दकौशल्यात वाकबगार असलेल्या महाराजांचे डावपेच यशस्वी...
खान स्वतः जावळीत यायला तयार...
भेटही कुठे...? जननीच्या टेंबावर भव्य शामियान्यात...
बारीकसारीक हालचाली गडावरून नजरेच्या टप्प्यात...
१० नोव्हेंबर १६५९
भर दुपारी...दोन सूर्य...!
एक वर एक खाली...
महाराज आणि खानाची गळाभेट...
महाराजांना खानाचा दगाफटका...
अन् वाघनखांमध्ये खानाचा कोथळा...
सय्यद बंडाचा महाराजांवर वार...
होता जिवा म्हणून वाचला शिवा...
इशारा होताच जावळी थरारली...
महाराजांनी खानाला सह्याद्री दाखवला...
मावळ्यांनी खानाच्या सैन्याला जावळी...
या काही तासच चाललेल्या या एका लढाईने स्वराज्याचा चेहरामोहरा बदलून टाकला. महाराजांचा प्रचंड दबदबा निर्माण झाला. पुढच्या काही दिवसांतच कोकण कोल्हापूपर्यंतचा प्रदेश स्वराज्यात आला. महाराजांची घौडदौड सुरूच होती. त्यांची गती पाहून काळानेही तोंडात बोटं घातली असतील तेव्हा.
▪▪▪▪▪▪▪
शिवाजी भोसले हे नाव भारतभर पोचवणार्या लढाईचा साक्षीदार, जावळीचा शिलेदार ‘दुर्ग प्रतापगड'.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हेरलेल्या नजरेने भोरप्याच्या डोंगराचं बदललेलं रूप, जावळीच्या खाणीतलं हे अस्सल रत्न. दुर्ग प्रतापगड.
सकाळी आठ वाजता गडावर गर्दी नसेल असं वाटलं होतं, पण वीस कि.मी. वर असलेल्या महाबळेश्वरहून आलेल्या पर्यटकांच्या काही गाड्या आधीच पार्किंगमध्ये उभ्या होत्या. बुरुजावर भगवा दिमाखात फडकत होता. तटबंदीत बेमालूम लपलेल्या मुख्य प्रवेशद्वारतून वर आलो. शाळेतल्या इतिहासाच्या पुस्तकात प्रसिद्ध असलेल्या चिलखती बांधणीच्या टेहळणी बुरूजावरून नजर फिरवली. जावळीचं खोरं नजरेत भरून घेतलं. नजर जाईल तिकडे दाट जंगल. पूर्वेला समोर महाबळेश्वर. प्रतापगडाचे मुख्य आकर्षण असलेल्या या अफजल बुरूजावर थोडा वेळ थांबून तिथून पुढे पायर्या चढून भवानी मंदिरात प्रवेश केला. छत्रपती शिवाजी महाराज हे भवानी मातेचे निस्सीम भक्त होते हे सर्वज्ञात आहे. त्याच भक्तीतून त्यांनी प्रतापगडावर भवानी मातेचे मंदिर उभारले. नेपाळच्या गंडकी नदीतून मागविलेल्या शाळिग्राम पाषाणातली पुण्याच्या बाबाजी नाईक यांनी घडवलेली भवानी मातेची मूर्ती तेजस्वी आहे. मंदिरातच सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार पाहायला मिळाली. मंदिराच्या आवारात गडावरील त्यावेळी वापरात असलेली काही लोखंडी हत्यारे आणि भांडी रांगेत रचून ठेवलेली पाहायला मिळतात. तिथून बाहेर पडून मी बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो, बालेकिल्ल्याच्या वाटेवर दोन्ही बाजूला दुकानं आणि त्या दुकानांच्या टेबलवर ताकाची ग्लासं मांडून ठेवलेली दिसतात. एका दुकानात थांबून आधी एक ग्लास ताक प्यालो व सुट्टे पैसे नसल्यामुळे आल्यावर आणखी एक ताक नक्की करून पुढे निघालो. गोमुखी बांधणीच्या प्रवेशद्वारातून पुढे जाताच समोर केदारेश्वराचे मंदिर नजरेस पडले. गडबांधणीच्यावेळी खोदकाम करताना सापडलेल्या शिवलिंगाची या मंदिरात स्थापना करण्यात आलेली आहे. मंदिराच्या समोरच राज सदर होती जिथे बसून महत्त्वाचे निर्णय घेतले जायचे, ती सदर आज अस्तित्वात नाही फक्त जोता शिल्लक आहे. इथूनच उत्तरेकडे बागेत जाणारी वाट आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अनावरण केलेला भव्य अश्वारूढ पुतळा आहे. या जागेवर महाराजांचा राहता वाडा होता. महाराजांच्या त्या भव्य रूपासमोर आपोआप नतमस्तक व्हायला होते. जवळच कडेलोट पॉईंट आहे. तिथून खाली वाकून पाहिलं, खरंच...! एखाद्याचा इथून कडेलोट झाला तर...! कल्पनाच करवत नाही. ही गडाची पश्चिम तटबंदी. नजरेसमोर विस्तिर्ण कोकण परिसर, खाली अतिखोल दरी, जावळीचे निबीड अरण्य... आंबेनळी घाटातली नागमोडी वळणं... सावित्री नदीचे नागमोडी पात्र... तो सगळा खोल परिसर अंगावर येतो. मी तटबंदीवरुन तसाच उत्तरेकडच्या रेडका बुरुजाकडे पुढे चालत राहिलो. या टोकावर पर्यटक शक्यतो येत नाहीत, मी गडाच्या उत्तर टोकावर आलो होतो, तेवढ्यात समोर एक कुत्रा दिसला, आधी दुर्लक्ष केले. पण माझी चाहूल लागताच तो खाली उतरू लागला. मला ओळखायला वेळ लागला तरी जमतील तसे फोटो घ्यायला मी वेळ लावला नाही. तो कुत्रा नव्हता, कोल्हा होता आणि मी तो पहिल्यांदाच पाहत होतो.
इथून उत्तरेकडचा सगळा परिसर व्यवस्थितपणे न्याहाळता येत होता. ज्या आंबेनळी घाटातून वर आलो, त्याची ती नागमोडी वळणं वरून खूपच सुंदर दिसत होती. प्रतापगडावरून चारही दिशांवर व्यवस्थित नजर ठेवता येते. तो सगळा परिसर नजरेत साठवून मी छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ आलो, ते रूप डोळ्यांत साठवले त्यांना कुर्निसात केला आणि खाली उतरू लागलो. बालेकिल्ल्याच्या बाहेर आलो. गडाच्या आग्नेयेला त्या पॅनोरमिक भव्य कोयनेच्या खोर्यात मधु मकरंदगड ठसठशीतपणे उठून दिसत होते. त्याची तहान बाकी ठेवून मी हातातला ताकाचा ग्लास रिता केला. पुरेसा वेळ देऊन गड फिरावा. गडाचा कानाकोपरा आपल्याशी संवाद साधतोय असं वाटतं.
गड फिरून झाला होता. गाडीत बसताना मनात विचार आला...हा आजचा आपणासाठी असलेला इतिहास जेव्हा वर्तमान होता तेव्हा कसलं भारलेलं वातावरण होतं असणार गडावर...! छत्रपती आणि जिजाऊ स्वत: राहिलेयत या गडावर... किती नशीबवान तो किल्लेदार...! ती गडावरली कुटुंब...! अन् ती जावळी तो सह्याद्री...!
घेऊनी हातात तलवार ढाल
लढले निधड्या छातीने शिवराय
विसरुनी तहान भूक निज
उभारले स्वराज्य नव शिवराज
लोळवुनी बलाढ्य शत्रूस मातीत
फडकविला तेज भगवा गगणात
उगवली पहाट नवी दारात
पसरली लाली केशरी अंबरात
कुहू कुहू कोकीळेची साद
डोलली पुन्हा गवताची पात
आला दाटून आनंद जनमनात
ऊरली न आता ती काळरात
गुंजतो इथे सदा शिवराय
सह्याद्रिच्या कडेकपार्यात
न झाला न होणे ऐसा राजा
निनादतात पडसाद त्रिलोकांत
निनादतात पडसाद त्रिलोकांत
_विजय सावंत
स्थळभेट - ०१/११/२०१९
फोटो आणि चित्रफीत- विजय सावंत
गडाचे बांधकाम करताना वापरलेला दगड या खाणीतून काढण्यात आला. त्याजागी पाणी भरून छोटासा तलाव निर्माण झाला. हेच पाणी गडावर राहात असलेल्या कुटुंबांची तहान भागवतं.
भवानी मातेच्या मंदिराबाहेरील परिसरात मांडून ठेवण्यात आलेली काही शस्त्रे.
#pratapgad #chatrapatishivajimaharaj #mahabaleshwar


















👌🏻👌🏻
ReplyDeleteतुमच्या लेखणीतुन गड फिरल्याची प्रचिती आली. सुरेख.
ReplyDeleteगड किल्याचे फोटो अप्रतिम👍
धन्यवाद!🙏
Deleteखूप सुंदर वर्णन आणि फोटोज👌🏻👌🏻👌🏻......
ReplyDeleteधन्यवाद?🙏
Deleteआम्हीपण गडावरच असल्याचा भास झाला!
ReplyDelete👍🏻
Deleteवाह विजय, नेहमीच अप्रतिम , खूप खूप धन्यवाद
ReplyDeleteRelived the maratha era through your poems and literature along with beautiful photography. Jai bhavani jai chatrapati shivaji maharaj🚩🚩🚩🚩
ReplyDeleteThank you!🙏🏻
Delete