आणि बरंच काही- साल २०२०
साल २०२०
आज २०२०चा शेवटचा दिवस. हे वर्ष आतापर्यंतच्या जगत आलेल्या आयुष्यातलं एक वेगळं वर्ष. देवी, पटकी, प्लेग हे रोग शाळेत असल्यापासूनच माहीत होते. म्हणजे त्यांच्यावर प्रश्नही असायचे परीक्षेला. सत्तर ऐंशीच्या दशकात जन्मलेल्यांचा फक्त उत्तर देण्यापुरताच काय तो संबंध या रोगांशी. विज्ञानाच्या प्रगतीचा तोच काळ. जसजशी ही पिढी मोठी होत होती तसतसं विज्ञानही नवनवे आविष्कार घडवत होतं, वैद्यकीय क्षेत्रात तर नवनवीन प्रयोग सुरूच होते. त्यांनी माणसाचं आयुष्य सुकर केलं. वेदना कमी केल्या. वाटलं होतं आता माणसाने पूर्ण ताबा मिळवलाय सर्व रोगांवर...किती बिनधास्त झाला होता तो!
२०२०च्या सुरवातीला वुहानच्या बातम्या पुसटशा येऊ लागल्या आणि त्यानंतर महिन्याभरातच वुहान हे येऊ घातलेल्या जगावरच्या नव्या संकटाचं केंद्र आहे हे ठळकपणे समोर आलं. तोपर्यंत तिथल्या बातम्या आणि व्हिडिओंनी WAवर जागा व्यापायला सुरवात केली होती. घरात कोंडून ठेवलेल्या माणसांचे व्हिडिओ समोर येऊ लागले. नागरिकांनी घराबाहेर येऊ नये म्हणून पोलिसांनी त्यांच्या घराच्या दारावर उभ्या आडव्या फळ्या मारल्याचे व्हिडिओ बघून हे अविश्वसनीय वाटायला लागले. फेब्रुवारी महिन्यात शंकेची पाल चुकचुकली. मार्च उजाडेपर्यंत कोविड १९ या विषाणूने जगभर थैमान घालायला सुरुवात केली होती. ‘लॉकडाऊन' हा शब्द वारंवार कानावर येऊ लागला. इटलीमध्ये या विषाणूने खूप थैमान घातले आहे, संपूर्ण इटली लॉकडाऊन, फ्रान्स, अमेरिका, रशिया, जर्मनी, लंडन, जागतिक महासत्ता पहिल्यांदाच लॉकडाऊन झाल्या असाव्यात. इटली, रशिया, अमेरिकेहून आलेल्या, तिथल्या भारतीयांनी पाठवलेल्या काही व्हिडीओंनी भारतात तयार होऊ पहात असलेल्या गंभीर वातावरणात अधिकच भर घातली. मिडियाने या संधीचा फायदा घेण्याची कुठलीही कसर बाकी ठेवली नाही. संयतपणे बातम्या देता येऊ शकतात यावर आमच्या देशातल्या न्यूज चॅनलचा विश्वास नाही. भारतातली कोविड परिस्थिती एखाद्या चित्रपटातल्या क्लायमॅक्ससारखी वर वर नेण्यात कोणाचा वाटा असेल तर तो मिडियाचा. मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भारतात सगळे व्यवहार सुरळीतपणे चालू होते. पण भारतीय न्यूज चॅनल आणि समाजमाध्यमांवर अव्याहतपणे येऊन धडकणार्या बातम्यांनी कोविड १९ हे काहितरी गंभीर प्रकरण आहे, या निर्णयाप्रत भारतीय समाज येऊन पोहोचला. नाक्या नाक्यांवर, WA वर, FB वर, TV च्या पडद्यावर एकच विषय, कोरोना. आणि जे अविश्वसनीय वाटत होते ते लॉकडाऊन भारतात २४ मार्चपासून लागू झाले. पुढे तीन महिने टिकले. या लॉकडाऊनच्या काळातल्या कितीतरी गोष्टी लॉकडाऊनमध्ये घरी बसून प्रसारमाध्यमांमुळे कळत होत्या. लॉकडाऊनचा काळ हा लिखाणाचा स्वतंत्र विषय आहे. त्याचा आवाकाही मोठा आहे.
लॉकडाऊनचा काळ संपुष्टात आल्यानंतर दबकत दबकत लोक बाहेर पडायला लागले. तोपर्यंत लोकांच्या लक्षात आलं की जे भीतीचं चित्र न्यूज चॅनलनी आणि प्रसारमाध्यमांनी उभं केलं होतं ते अतिरंजित होतं. विकसित देशांची दैना उडवून देणाऱ्या या विषाणूमुळे भारतात हाहाकार माजेल हे जे काही चित्र उभं केलं गेलं होतं ते साफ खोटं ठरलं. याचे मोठे श्रेय देशात कार्यरत असलेल्या सरकारी यंत्रणांना जातं. तसेच भारतीय खानपान आणि भारतीयांत असलेली नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती यांना नक्कीच जातं. दुर्दैवाने या विषाणूमुळे मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांची संख्याही लक्षणीय आहे. या विषाणूवर चाललेला अभ्यास पुढील काळात जगासमोर येईल. त्याच्यावर पूर्णपणे नियंत्रणही मिळवले जाईल. पण त्याने मानवाची उडवलेली दैना मात्र पुढील काही शतके चर्चेचा विषय राहील. या वर्षात जे काही घडलं त्यातून मानवाने योग्य बोध घेतला आणि भविष्यातल्या मानवाच्या आणि या सृष्टीच्या भल्यासाठी सर्वांनी मिळून काहीएक चांगला ठराव मांडला तर २०२० हे वर्ष म्हणजे समस्त मानवजातीच्या प्रवासातला एक मैलाचा दगड ठरला असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
विजय सावंत
३१/१२/२०२०




Mastt👍👍
ReplyDeleteTrue..👍🏻
ReplyDelete