कवडसा- आडवाटेवरचा खजिना-६ श्रीराम मंदिर, रामटेक



आडवाटेवरचा खजिना - ६

श्रीराम मंदिर, गड रामटेक

जिल्हा- नागपूर

        बालपणी शाळेच्या पुस्तकात पाहिलेलं रामटेक आज नजरेसमोर होतं. खरं तर नागपूरहून रामटेकचं श्रीराम मंदिर पाहायला आलो होतो. रामटेक म्हणजे श्रीराम मंदिर एवढंच डोक्यात होतं, पण वाकाटकांच्या साम्राज्यात कधी गेलो कळलंच नाही. रुद्र नरसिंह, केवल नरसिंह, सिंदूर बावली आणि त्रिविक्रम मंदिर हा ध्यानीमनी नसताना अनपेक्षितपणे गावलेला खजिना. त्याबद्दलची स्वतंत्र पोस्ट याच ब्लॉगवर आहे.

गडमंदिराच्या वाटेवरून होणारे श्रीराम मंदिराचे पहिले दर्शन.

        आपल्या वनवासकाळात श्रीरामांनी या डोंगरावर काही काळ वास्तव्य केले होते; त्यावेळी इथे असलेल्या ऋषीमुनींना राक्षसांच्या त्रासापासून सोडवण्यासाठी श्रीरामांनी प्रतिज्ञा केली. टेक म्हणजे प्रतिज्ञा. तेव्हापासून हा डोंगर रामटेक या नावाने ओळखला जातो. 

            सिंदूर बावलीच्या समोरून एक वाट गडमंदिरापर्यंत जाते. पहिला दरवाजा, वराह दरवाजा.  एखाद्या गडकोटाला शोभेल असा. पायर्या चढून वर येताच पांढरं शुभ्र धोतर नेसलेले एक वयस्कर काका डावीकडे बसलेले दिसले, स्थानिक होते. त्यांच्याकडून मंदिराची काहीतरी माहिती मिळेल म्हणून मीच बोलायला सुरवात केली. 

     “ ये बहुत पुराना मंदिर है, रघुजी भोसलाने जो बंगाल की लूट लाई थी उसमें से कुछ हिस्सा इस मंदिर और अन्य कुछ मंदिरों पर  खर्च कीया  था, इसकी तटबंदी उन्होने ही करवाई।" काकांनी सांगायला सुरुवात केली.

आणखी बर्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या “और वो सामने वराह शिल्प जो है उसके पेट के निचे से जाना।" 

         त्यांनी त्या वराह शिल्पाच्या पोटाखालून जायला सांगितलं खरं पण मी ते मनावर न घेता तिथून उठलो आणि त्या भव्य वराहशिल्पाजवळ आलो. हे तौलनिक दृष्ट्या साधे मंदिर असून चार रुचक प्रकारचे स्तंभ असलेला मंडप असे त्याचे स्वरुप आहे. चौरस स्तंभ दोन कमलतबकांनी सुशोभित केलेले आहेत. त्याचे फोटो काढण्यात मग्न असतानाच त्या चौथर्यावर बसलेली मुलं म्हणाली “वो देखो, वो काका तुम्हे बुला रहे हैं" 

“अरे जाओ... जाओ।" काका लांबून हाताने इशारा करत होते. वरहाच्या पोटाखालून मला जाताना बघण्यात काकांना एवढा इंटरेस्ट का ते नंतर कळाले.

एरव्ही  त्या वराहच्या पोटाखालून जाण्याचा माझा काही विचार नव्हता, पण मी वराहच्या पोटाखालून जाऊ शकतो की नाही हे पाहत ते उभे होते. त्या बुजुर्गाचं मनही मोडवत नव्हतं. मी अगदी विनासायास लीलया त्या वराहच्या पोटाखालून बाहेर पडलो तसे ते काका पुढे जायला निघाले. बालहट्ट पाहिला होता, हा असा बुजुर्ग हट्ट पहिल्यांदाच.

    

          पहिला वराह दरवाजा
          वराह मंदिर

           सिंधपूर दरवाजातून आत येताच समोर एखाद्या किल्ल्याला शोभतील असे बुरुज, आणि भव्यदिव्य भैरव दरवाजा.

          भैरव दरवाजा आणि समोर दिसतोय तो गोकुळ दरवाजा.
    
           प्राचीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना गोकुळ दरवाजा. 

     दुसर्या सिंधपूर दरवाजातून आत आलो, समोर मोठं प्रांगण, दोन्ही बाजूला दुकाने, समोर किल्ल्याला शोभेल असा लाखेचा थर चढवलेला आणखी एक भव्य भैरव दरवाजा, दोन्ही बाजूला एखाद्या किल्ल्याला शोभतील असे बुरुज. भैरव दरवाज्यच्या अलिकडे डावीकडे सरबताच्या दुकानातल्या खुर्चीवर काका बसले होते. मी दिसलो तसा मलाही सांगितले बसायला. साधारणतः ऐंशी वर्षांचे ते काका श्रीरामाचे भक्त असावेत, काही पावले चालल्यावर थांबत, बसत, मग पुढे जात. काही वेळाने त्यांना तिथेच सोडून मी तो भव्य भैरव दरवाजा ओलांडून पुढच्या प्रांगणात आलो. इथेही दोन्ही बाजूला दुकाने, आणि समोर गोकुळ दरवाजा...  गोकुळ दरवाजावरची कलाकुसर लक्षवेधक आहे, पुरातन शिल्पांची काही प्रमाणात झीज झाली आहे, गोकुळ दरवाजा हाच एक खजिना आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. या दरवाजातून आत शिरताच रामटेक डोंगराच्या पश्चिम टोकावर उभारलेला मंदिरांचा समूह नजरेसमोर येतो. उजवीकडे श्री हनुमान मंदिर त्याच्या पुढ्यात श्री लक्ष्मण मंदिर आणि लक्ष्मण मंदिराच्या मागे श्रीराम मंदिर. नागर शैलीत उभारलेल्या मंदिरांचा सुंदर समूह.   

          रामटेक मंदिर समूह

  

    श्री हनुमान आणि श्री लक्ष्मण मंदिरात जाऊन दर्शन घेऊन मी श्रीराम मंदिरात आलो, सुंदर मंदिर. सभामंडप मोठा आहे. डावीकडे भोसले नागपूरकर गादीच्या वारसांच्या तसबिरी तसेच तलवारी, ढाल, बंदुका आणि इतर शस्त्रे मांडण्यात आली आहेत. गर्भगृहातील  वनवासी वेशातल्या काळ्या पाषाणातल्या सीतामैया श्रीरामासमोर हात जोडून उभा असतानाच आरती सुरू झाली. आरती संपताच हातात तिळगुळाची वडी प्रसाद म्हणून मिळाली, खूप स्वादिष्ट होती. तिथून बाहेर पडून मी ती मंदिरं न्यहाळू लागलो, खूप सुंदर, मातकट झाक असलेली शुभ्र नागर वास्तूकला. 

       

             श्रीराम मंदिराला लागून असलेल्या मनोर्यातून दिसणारे रामटेक.


     श्रीराम मंदिराला लागून असलेला रघुजी भोसले यांचा महाल.

      वाकाटककाळामध्ये गडावर श्रीरामचंद्रांच्या पादूकांची पुजा केली जात असे. या पादुकांची प्रतिष्ठापना वाकाटक राणी प्रभावतीगुप्ता हीच्या काळात झाली याविषयीचा उल्लेख ऋध्दापूर येथे सापडलेल्या ताम्रपटात आला आहे. गडावरील राम मंदिर हे एक महत्वाचे स्थान असून तेराव्या शतकातील आहे. तथापि मंदिरातील मूर्तींची पुन:स्थापना प्रथम रघुजी भोसले यांच्या काळात १७५३ साली करण्यात आली. (रघुजी भोसले... अठराव्या शतकातील मध्य भारतातलं एक प्रभावी व्यक्तिमत्त्व, अगदी बंगालपर्यंत नावाचा दबदबा असणारं.) याविषयीची नोंद नागपूरकर भोसले यांच्या शकावलीवरून मिळते. रघुजी भोसले प्रथम यांना देवगड स्वारीत मिळालेल्या विजयानंतर त्यांनी जयपूरहून नवीन मूर्त्या मागविल्या, परंतु त्या नवीन मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याआधी अचानकपणे शरयू नदीत मिळालेल्या मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली, याविषयीची नोंद उपलब्ध आहे.

        मंदिरे नागर प्रकारची असून राममंदिरच्या पुढच्या बाजूस मुखमंडप आणि त्याच्यापेक्षा मोठे दोन बाजूस दोन अर्धमंडप आहेत. गर्भगृहाचे दरवाजे चांदी व पितळेने मढवलेले आहेत.

          खरं तर जिथे राम सीता,  लक्ष्मण तिथे. पण विशेष म्हणजे गडावर श्रीराममंदिराच्या पुढ्यातच लक्ष्मणस्वामींची  वनवासी वेशातली मूर्ती असलेले स्वतंत्र मंदिर आहे. सभामंडप आठ स्तंभांवर उभा असून सभा मंडपाच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर यादव राजा रामदेवराय (इसवी सन १२७१ - १३१२) यांच्यावेळचा शिलालेख कोरलेला आहे.

         राममंदिराला लागून उजव्या हाताला एक मनोरा आहे. मनोरा चढल्यावर तिथून खालचा रामटेकचा विहंगम परिसर नजरेत भरतो, उत्तरेला जैन मंदिर लक्ष वेधून घेते. मनोर्याच्या समोर भोसलेंचा महाल आहे. गडावर श्रीरामाच्या दर्शनासाठी आले की ते या महालात थांबत. मनोरा उतरून खाली आलो, तेव्हा मघाशी दिसलेले काका श्रीराम मंदिराच्या पायर्यांवर झाडलोट करताना दिसले.

अं हं! श्रीरामाचा एक सच्चा भक्त दिसला.

             मुख्य मंदिर पाहून झाल्यावर मी तो परिसर फिरू लागलो.   मंदिर परिसरात अगस्ति श्रृषींचा मठ आहे, इथे अखंड ज्योत तेवत असते. दोनशे तीनशे वर्षांपूर्वीची त्याकाळी वापरात असलेली काही हत्यारे, तलवारी, तंतूवाद्ये भिंतीवर टांगून ठेवण्यात आली आहेत.

         गोकुळ दरवाजाचं सौंदर्य पुन्हा एकदा डोळ्यात साठवून घेतलं. दरवाजातून बाहेर आल्यावर दक्षिणेला रामकुंड आहे तर थोडं खाली उतरल्यावर सीताकुंड, किंवा सीतेची न्हाणी. या स्थानाचा उल्लेख स्थानपोथी या ग्रंथात आलेला आहे, तसेच ‘जनकतनयास्नानपुण्योदकेषु'(ज्यामधील जल सीतामातेच्या स्नानामुळे पवित्र झाले आहे) असे वर्णन  कालीदासांनी केले आहे. सीताकुंडाजवळून एक वाट खाली उतरते. इथला परिसर एखाद्या किल्ल्याला शोभेल असाच. इथून वर दिसणारा  श्रीराम मंदिराचा कळस, आणि खाली दक्षिणेला पसरलेला रामटेकचा परिसर  लाजवाब.

     

           अगस्ति ऋषींच्या आश्रमात जतन करून ठेवण्यात आलेली काही दुर्मिळ तंतू वाद्ये.   

       रामकुंड

        सीतेची न्हाणी अर्थात सीताकुंड
  
            रामटेक गावातून गडावर येणारी एक वाट
    
    
         गडावरून दिसणारे रामटेकचे विहंगम दृश्य.

      वाकाटककालीन रुद्र नरसिंह मंदिर, केवल नरसिंह मंदिर, सिंदूर बावली, त्रिविक्रम मंदिर, कालीदास स्मारक, वराह मंदिर, महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधरस्वामींचा संबंध आलेले भोगराम मंदिर, तसेच चार दरवाजे, दुहेरी तटबंदी, नक्षीबंद कमानी, रामकुंड, सीतेची न्हाणी, गोकुळ दरवाजावरील नक्षीकाम आणि शिल्पकला, नागर शैलीतील वास्तूकलेचा उत्तम नमुना असलेला भारतभरात एकमेकाद्वितिय असलेला हा रामटेकवरील प्राचीन मंदिरांचा समूह एकदातरी आयुष्यात आडवाट करून बघण्यासारखा.

               

              दुपारचे दीड वाजले होते, गड रामटेक फिरून झाला होता. मघाशी पहिल्या दरवाजापाशी वराह मंदिराजवळ जे काका बसले होते तिथे आलो. लक्ष समोरच्या कट्ट्यावर गेले. एक भलंमोठं कुटुंब कट्ट्यावर बसलं होतं. कमावते आईवडिल सकाळीच पोटाची व्यवस्था करायला गेले होते, आपली चिलीपिली, घरातल्या म्हातार्याकोतार्यांकडे सोपवून, मन घट्ट करून...  त्यातल्या एका पिटुकल्याची दोरखंडाबरोबर धमाल मस्ती चालली होती. ती मस्ती मन लावून बघत असतानाच कुठूनतरी एक आई आली... जणू काही खूप दिवसांनी भेटतेय... तिने आल्याआल्याच आपल्या बाळाला उचलून घेतलं... पटापट चारपाच वेळा त्याच्या गालाचे मुके घेतले... आणि ...छातीशी कवटाळलं.

 



      मी आ वासून पाहतच राहिलो ते ओतू चाललेलं मातृत्व.

      असं हे रामटेकचं महात्म्य!

_विजय सावंत

स्थळभेट - १६/०१/२०२०

फोटो - विजय सावंत

#Ramtek 

#shrirammandir 


Comments

  1. खुप छान माहिती आणि फोटो, अगदी नेहमीप्रमाणे विजय.
    मी नागपुरात असताना मला जायला जमले नाही, पण कसर तु भरून काढलीस.
    खूप खूप धन्यवाद 👍👍🙏🙏

    ReplyDelete
  2. छान आणि धावते वर्णन.
    नागर शिल्पकृतीची वैशिट्ये विशद केली असती तर जिज्ञासा शमली असती.
    रामटेक आणि कवि कालिदास ह्यांच्याबाबतीत काही संदर्भ आहे का ?
    प्रकाशचित्रांमुळे समजण्यास सुलभता आली.
    धन्यवाद सर ! 🙏

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
      भारतीय मंदिराच्या वास्तूशैलीवर एक पोस्ट विचाराधीन आहे.

      Delete

Post a Comment