कविता- माझं गाव

                       माझं गाव

सह्याद्रीच्या गच्च कुशीतलं तू आहेस माझं गाव
नदी उगवाई वाहे मधूनी पावसाळी घेई धाव

पिकवी गोटा भाताचा होई ओलं हिरवं शिवार
सोनराशीनं भरून जाई पाटलं माझं दार

वनराईत उभी आमुची ग्रामदेवी गांगोमाऊली
तिला लाभली पाहा कशी ही सह्यगिरीची सावली

दिले भरभरून निसर्गानेही उधळले मुक्तहस्ते
वळणावळणातून गावात उतरती सुंदर नागमोडी रस्ते

मराठमोळ्या परंपरा अजुनि जपल्या आहेत जिथे
धाव घेई चाकरमानी शिमगा चतुर्थीला इथे

कधीकाळी होता इथे मोठा बाजाराचा काळ
घाट आणि कोकणच्या मालाने फुलून जायचा माळ

स्वप्नाहून सुंदर आहे काय वर्णावा मी थाट
रूबाब त्याचा नका विचारू नाव फोंडाघाट
माझे गाव फोंडाघाट

© विजय सावंत

Comments